ठाणे : ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या जेष्ठ- श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात ६० वर्षांपासून आजतागायत पत्रकारिता करणारे पीटीआय, यूएनआय या राष्ट्रीय वृत्तसंस्थांचे जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ११ जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन तसेच पत्रकार कल्याण निधी,  अधिस्वीकृती समिती, व राज्यस्तरीय आरोग्य समितीवर नियुक्त झालेल्या आठ पत्रकारांना गौरविण्यात आले.

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मराठी ग्रंथसंग्रालयाच्या सभागृहात शनिवारी पत्रकार मेळावा झाला. मराठी पत्रकार परिषेदेचे विश्वस्त किरण नाईक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय वैध, माजी सचिव योगेश त्रिवेदी, माजी माहिती अधिकारी निरंजन राऊत, उपाध्यक्ष तुषार राजे, सरचिटणीस नारायण शेट्टी, सचिव श्रीकांत खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मेळावा घेण्याचा हेतू आणि प्रस्तावना दिलीप शिंदे यांनी विशद केली.गेली ७४ वर्ष ठाण्यात वास्तव्य करून ठाणे जिल्ह्यातील घडामोडींचे वार्तांकन करून देशभरात पोहचविण्याचे काम करीत असलेले  जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांचा प्रमुख पाहुणे किरण नाईक, अध्यक्ष संजय पितळे, मनोज सानप यांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये २५ हजारांची थैली, मानपत्र,  सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, फुलगुच्छ यांचा समावेश होता.

ठाणे जिल्ह्यातील जडणघडणीत आपल्या लेखणीने योगदान देणारे कल्याणचे जेष्ठ पत्रकार नाना पिसाट, मुरबाडचे जेष्ठ पत्रकार सुधीर पोतदार, ठाण्याचे संपादक राजाराम माने, नवी मुंबईचे जेष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, शहापूरमधील  जेष्ठ पत्रकार प्रकाश परांजपे, भिवंडीच्या जेष्ठ पत्रकार कुसुमताई देशमुख, अंबरनाथमधील जेष्ठ संपादक पांडुरंग रानडे,  मीरा- भाईंदरचे जेष्ठ पत्रकार अनिल खेडेकर,  जेष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी, आणि  ज्येष्ठ कॅमेरामन अशोक गुप्ता यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  त्याचबरोबर अकरा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे मुक्त पत्रकार  प्रशांत सिनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राज्य पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झालेले जेष्ठ संपादक कैलाश म्हापदी आणि राज्य अधिस्वीकृतीवर निवड झालेले जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे, विनोद जगदाळे, जयेश सामंत, संजय पितळे तसेच मुंबई विभाग समितीवरील विभव बिरवटकर आणि कोकण समितीवरील मनोज जालनावाला तसेच आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे  विश्वस्त किरण नाईक,  विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, कैलास म्हापदी, मनोज सानप आणि मेळाव्याचे अध्यक्ष संजय पितळे यांनी पत्रकार संघाची आगामी वाटचाल आणि पत्रकारांची भूमिका, त्यांच्या कल्याणकारी योजनायासंदर्भात मार्गदर्शन केले. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मेळावा आणि जीवनगौरव पुरस्कार विजेते एस. रामकृष्णन यांना पाठविलेला संदेश वाचुन दाखविण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केले तर मानपत्राचे वाचन दीपक दळवी यांनी केले. संघाचे सरचिटणीस नारायण शेट्टी यांनी आभारप्रदर्शन केले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *