प्रासंगिक
स्वाती पेशवे
जगण्यातील ताणतणाव ही काही आजची गोष्ट नाही. तणावांमागील कारणे वेगळी असली तरी त्याने कधीच माणसाची साथ सोडलेली नाही, हेही खरेच. त्याच्या प्रभावाखाली जगणारा समाज कधी कधी निखळ हसणेच विसरतो. म्हणूनच ‘एप्रिलफूल’सारखे प्रयोजन बघायला मिळते. दुसर्याला मुर्ख बनवण्यात वेगळीच मजा असते आणि कोणतेही नुकसान न झाल्यास मुर्ख होणेही स्वभावाला मानवते.
अगं… अगं… तुझ्या अंगावर झुरळ आहे बघ…, ड्रेस फाटलाय मागून…, शाई सांडतीये दफ्तरात…, मावशीने तुला लवकर बोलायले आहे घरी, पाहुणे आले आहेत… ओळखीचे वाटताहेत ना हे संवाद? आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणार्या पिढीने लहानपणी झेललेले आणि फेकलेले अतिशय परिचित असे संवाद आहेत ते! फसवण्याचा, एकमेकांना फूल (उल्लू) बनवण्याचा परवाना देणार्या एक एप्रिलला प्रतिभेची आणि विचारांची मर्यादित कुमक असण्याच्या त्या काळात अशाच संवादांनी एप्रिलफूल झाल्याचा वा केल्याचा निर्भेळ आनंद साजरा केला जायचा. आता त्या बालिशपणाचे हसू येते… पण दुसर्याला वेडे बनवण्यातला आनंद आजही कमी झालेला नाही हे ही मान्य करावे लागते. त्यामुळेच जागतिक पातळीवर साजर्या होणार्या आणि हसत हसत मूर्ख बनवणार्यांच्या टोळीमध्ये सामील होण्याची धडपड आजही केली जाते. तसे पाहायला गेले तर वर्षभर या ना त्या कारणाने आपण ‘फूल’ ठरतच असतो. कारण पूर्वीच्या तुलनेत असे उपद्व्याप करणार्यांची संख्याही आता वाढली आहे. सहाजिकच अशा ‘फुलां’ची बाग आता अधिकच बहरली. प्रलोभने वाढली, रात्रीच नव्हे तर दिवसाही स्वप्ने पडू लागली आणि या दिवास्वप्नांचा पाठलाग करण्याच्या नादानेही अनेकांना मुर्खांच्या कळपात सामावून घेतले. पूर्वी वर्षातून एकदा ‘फूल’ होण्यात गंमत वाटायची. मात्र ही गंमत पाकिटावर डल्ला मारु लागल्यामुळे आता त्याची काळजी वाटते.
बरे… आपल्याला फूल बनवणार्यांचे अलिकडचे फंडे तरी किती वेगवेगळे…! कधी शिक्षण फूल बनवते, कधी गुंतवणुकीचे चुकीचे सल्ले फूल बनवतात, कधी भरभक्कम रक्कम मोजून मागवलेली उत्पादने आपल्याला मुर्ख बनवून जातात, कधी एखादा तथाकथित मित्र वा मैत्रीण आपल्याला सहज मुर्खात काढून जाते… अगदी एखादा वैद्यकीय तज्ज्ञ मृत्यूशय्येवरील माणसाला लवकरच ‘बरे व्हाल हो…’ असे सांगत खोटा दिलासा देतो तेव्हा एक प्रकारे त्याला फूलच बनवतो. समोर धोका दिसत असूनही त्याकडे डोळेझाक करण्यास भाग पाडून एका भासमान जगात जगण्यास उद्युक्त करणारी आजची प्रत्येक गोष्ट आपल्याला उल्लू बनवते आणि बुद्धी गहाण ठेवून आपण ती सहर्ष स्विकारतो. म्हणूनच सध्या केवळ एक एप्रिललाच नव्हे तर वर्षातील कुठल्याही दिवशी आपण हा दिवस साजरा करतो, असे म्हणण्यास पूर्ण वाव आहे. हा ‘फूलबाग’ अधिकाधिक बहरत आहे.
तसे पहायला गेले तरी उल्लू बनण्यामागील काही कारणे ‘सात्विक’ही असतात. अडचणीत असताना पैसे मागण्यास संकोच करतोय हे ओळखून एखादा मित्र नकळत त्याच्या खिशात नोट सरकवतो आणि अरे, आपण ही रक्कम विसरुनच गेलो की, असे म्हणतो. अशा वेळी ती हाती लागलेला माणूस सुखावतो तेव्हा एक प्रकारे मुर्खच बनलेला असतो. कधी कधी एखाद्या ग्रुपमध्ये कंपूशाही अचानक डोके वर काढते आणि आपल्याला वगळून बाकीच्या मैत्रिणींनी सिनेमा बघितल्याचे इंस्टाग्रामच्या स्टोरीवरुन कळते तेव्हाही एप्रिलफूल झाल्यानंतर येते तशीच विषण्णता येते. फार कशाला, जोडीदाराने न सांगता झोडलेली एखादी पार्टीही आपल्या विश्वासाला तडा गेल्याचे दु:ख देते आणि मुर्ख बनल्याची जाणीव प्रबळ होते. थोडक्यात काय, तर कॅप्सुलमध्ये भरुन कडूजहर औषध देण्यापासून भल्यामोठ्या पॅकिंगमध्ये पेपरच्या गुंड्याळ्या भरुन बारीकशी भेटवस्तू देण्यापर्यंत कोणी कोणाला उल्लू बनवत असतो आणि कोणी तरी फूल होत असतो. त्यामुळेच वर्षातील एका दिवशी कोणतेही नुकसान न करता कोणी तुम्हाला मुर्ख बनवले तर राग मानू नका.
हा दिवस साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणांची यादी बरीच मोठी आहे. त्यापैकी एक म्हणजे पूर्वीच्या काळी रोमन लोक एक एप्रिल हा नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करत असत. पण, पोप ग्रेगरी (आठवा) याने ग्रेगेरियन कालगणनेचा प्रारंभ केला (ग्रेगेरियन म्हणजे आपण आता वापरत असलेली कालगणना). त्यानुसार नवीन वर्ष एक जानेवारीला साजरे केले जाऊ लागले. पण काही लोकांचा या बदलाला विरोध होता तर अनेक लोकांना या बदलाची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे या लोकांनी एक एप्रिललाच नवीन वर्ष साजरे केले. अर्थातच अशांची जागोजागी खिल्ली उडवली गेली. यातूनच ‘एप्रिल फूल’ या संकल्पनेचा जन्म झाला. ऐतिहासिक संदर्भ असणार्या या दिवसाचे प्रस्थ सोशल मीडियाच्या जमान्यात कमालीचे वाढले आहे. इतकेच कशाला, गुगलवर नुसते ‘एप्रिल फूल’ असे टाईप केले तरी इतरांना मूर्ख बनवण्याच्या असंख्य टिप्स सहज मिळून जातात. आजकाल ‘प्रँक’च्या नावाखाली इतरांना मूर्ख बनवणारे व्हिडिओे युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसतात तर अनेक टेलिव्हिजन किंवा रेडियो चॅनेल्सही विशिष्ट कार्यक्रमांद्वारे लोकांना रीतसर मूर्ख बनवण्याची योजना आखतात.
वेगवेगळ्या प्रकारांनी वेड्यात काढायचे आणि दोघांनीही याचा आनंद लुटण्याचे, बकरा बनवण्याचे अनेक मार्ग सध्याच्या मनोरंजनजगताने शोधून काढले आहेत. पण अशा खेळांमध्ये किती रमायचे आणि त्यातून कधी बाहेर पडायचे, हेदेखील समजायला हवे. अन्यथा, खेळ जीवही घेऊ शकतात हे अलिकडच्या अनेक ऑनलाईन गेम्सने दाखवून दिले आहे. अशा प्रकारे मुर्ख होणे व्यक्तीसाठीच नव्हे तर समाजासाठीही घातक आहे. मुळात उत्सव आणि विशिष्ट प्रथांचे प्रयोजन मनाला उभारी देणे, एकसुरीपणा कमी करणे, आनंद आणि उन्मेष निर्माण करणे हे असते. त्यानुसार एप्रिल फूलनिमित्त गंमत करण्यातही कमालीची विविधता दिसून येते. कॅनडा, न्यूझिलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सायप्रस आणि दक्षिण आफ्रिका अशा काही देशांमध्ये विनोद दुपारपर्यंतच केले जातात. एप्रिलफूलचा दिवस संपला असूनही तो साजरा करतोयस म्हणजे तू मूर्ख आहेस, असा टोमणा एखाद्या व्यक्तीला मारला जातो. फ्रान्स, इटली, दक्षिण कोरिया, जपान, रशिया, हॉलंड, जर्मनी, ब्राझील, आयर्लंड आणि अमेरिकेसारख्या देशात मात्र ‘एप्रिलफूल’ची गंमत दिवसभर साजरी केली जाते. फ्रान्स आणि इटलीमध्ये लहान मुले एकमेकांच्या पाठीवर कागदाचा मासा चिकटवतात आणि ‘एप्रिल फिश’ म्हणून टेर उडवतात.
इराणी लोक पर्शियन नववर्षाच्या तेराव्या दिवशी एकमेकांना मूर्ख बनवतात. हा दिवस एक किंवा दोन एप्रिल रोजी येतो. या प्रथेला ‘सिजदा बेदर’ असे म्हणतात. जगात अस्तित्वात असणारी सर्वात प्राचीन विनोद प्रथा म्हणून त्याकडे पाहिले जाते. स्पॅनिश भाषा बोलणार्या देशांमध्ये दुसर्याला मूर्ख बनवण्याची प्रथा २८ डिसेंबर रोजी साजरी केली जाते. कोरियात हिवाळा सुरू होतानाच्या पहिल्या दिवशी असाच एक सण साजरा केला जातो. त्या दिवशी एका भांड्यात बर्फ भरून परिचितांकडे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पाठवला जातो. मग हा बर्फ स्विकारणार्याला तो पाठवणार्याची इच्छा पूर्ण करावी लागते. अर्थात हा सगळा खेळीमेळीचा मामला असतो. पोलंडमध्ये एक एप्रिल हा संपूर्ण दिवस हास्यविनोदाने भरलेला असतो. सर्वसामान्य लोक, अगदी प्रसारमाध्यमेही या दिवशी खोट्या, विनोदी बातम्या पसरवतात. या दिवशी शक्यतो गंभीर बाबी टाळल्या जातात. याचा प्रभाव एवढा होता की १ एप्रिल १६८३ रोजी पोलंडचा राजा लिओपोल्ड (पहिला) याच्याबरोबर झालेल्या तुर्कविरोधी कराराची तारीख आदल्या दिवशीची म्हणजे ३१ मार्च ठरवण्यात आली. स्कॉटलंडमध्ये एप्रिलफूलचा दिवस ‘हंट द गॉक डे’ म्हणून साजरा होतो. गॉक म्हणजे मूर्ख व्यक्ती. या दिवशी संदेश पाठवून लोकांना मूर्ख बनवले जाते.
थोडक्यात काय तर, ताण कमी करण्याचा एक रिवाज म्हणजे एप्रिलफूल… आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपण निखळ हसणेच विसरलो आहोत. रात्रंदिवस काम आणि त्यामुळे वाढणारा ताण यातून काही क्षण निवांत जगायचे असतात, हे अनेकांच्या गावीही नसते. त्यामुळे तणावातून बाहेर पडण्यासाठी मानवी मनाला अशा प्रथांची भुरळ पडते आणि आनंद साजरा करण्याची ही संधी साधण्यात कोणी मागे राहात नाही. शेवटी, हसणे हाच जगण्याचा केंद्रबिंदू असायला हवा. त्यामुळेच असेल कदाचित, हल्ली हास्य क्लब्जची चलती आहे. एप्रिलफूलही आरोग्यावर, विशेषत: हृदयावर चांगला परिणाम करतो, असे संशोधन सांगते. अमेरिकेतील ‘सोसायटी फॉर व्हॅस्क्युलर सर्जरी’च्या विवियन हापर्नकडून हे संशोधन करण्यात केले होते. हसण्यामुळे रक्तप्रवाहात वाढ होते आणि रक्तवाहिन्यांचे काम सुधारते असा निष्कर्ष यावेळी निघाला. या दिवशी होणार्या हास्यविनोदामुळे मनावरचा ताण हलका होतो. हसण्यामुळे तणावाच्या हार्मोन्स (कॉर्टीसोल, एपिनेफ्राईन, डोपामाईन आणि ग्रोथ हार्मोन)चा स्तर खालावतो आणि आरोग्यदायी हार्मोन्स (म्हणजे एन्डॉर्फीन्स आणि न्युरोट्रान्समीटर्स)चा स्तर वाढतो. परिणामी, ताणतणाव दूर राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तेव्हा हे सगळे लाभ लक्षात घ्या आणि मुर्ख बनवण्यासाठी सज्ज राहा…
(अद्वैत फीचर्स)