ऐन युद्धाची सुरुवात होत असताना महापराक्रमी, महावीर अर्जुन त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य खाली टाकून श्री कृष्णापुढे उभा राहिला आणि म्हणाला की, “हे जगन्नियंत्या, मला जिकडे तिकडे माझी भावंडे, काका मामा दिसत आहेत. मी कुणावर आणि कसा बाण मारू ? मला हे युद्धच करायचे नाही…!” तेंव्हा कृष्णाला या वीराला समजावण्यासाठी आख्खी गीता सांगावी लागली. आज गीता सांगणारा कुणी कृष्ण दिसत नाही खरा, पण अर्जुनासारखे हतवीर्य झालेले नेते मात्र सर्वत्र दिसत आहेत.
राजकीय क्षेत्रात देशातील आणि राज्यातील सर्वात मोठे महाभरात सुरु झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची प्रक्रिया पार पडत आहे.असे असतानाही सर्वच पक्षांचे नेते कुरुक्षेत्रावरील त्या अर्जुनासारखे बावचळलेले दिसत आहेत. महाराष्ट्रातील मतदानाचा पहिला टप्पा हा १९ एप्रिल रोजी पार पडेल. या पहिल्या टप्प्यातील नागपूर, भंडारा, रामटेक, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा पाच जागांवरील अर्ज दाखल होऊन तिथे छाननीही पार पडली. रामटेक या महत्वाच्या मागासवर्गीय मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी बर्वे बाईंना दिली होती. पण त्यांचे जातीचे प्रमामपत्रच रद्द् झाल्याने त्यांचा अर्ज निकाली निघाला. तिथे काँग्रेसने त्यांच्या पतीचाही अर्ज डमी म्हणून भरून ठेवला होता. आता अन्य कोणतीही तांत्रिक अडचण न येता जर श्री बर्वेंना हाताचे चिन्ह मिळाले तर पक्षाची अब्रु वाचेल. अन्यथा पहिल्याच टप्पयात काँग्रसेचे चिन्ह एका मतदारसंघात नाही अशी नामुष्की ओढवेल.
पुढच्या २९ एप्रिलाल मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठवाड्यातील व विदर्भातील ११ जागांवरील उमेदवार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. तिसरा टप्पा आहे ७ मेच्या मतदानाचा. त्यात बारामती, सोलापूर, सांगली सारख्या महत्वाच्या जागा येतात. तिथे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुढच्या चार पाच दिवसांनंतर सुरु होईल. अशा स्थितीत आजही कोणताही पक्ष छातीठोकपणाने असे काही सांगू शकत नाही की,“झाले! आमच्या पक्षाचे संपूर्ण जागा वाटप पूर्ण झाले अनआता आम्ही सारे प्रचाराच्या कामाला लागलो आहोत!” राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष हे आघाड्या आणि युत्यांच्या गुंत्यात असे काही गुरफटलेले आहेत की कोणताच पक्ष हा स्वतंत्रपणाने निर्णय घेण्यासाठी सक्षम उरलेला नाही. भारतीय जनता पक्षाची राज्यात सर्वात मोठी ताकद आहे. आणि मित्रपक्षांच्या ताकदीला मर्यादा दिसत आहेत. तरीही मागच्या निवडणुकीत अखंड शिवसेनेबरोबर जितक्या जागा जिंकल्या होत्या, फक्त तितक्याच म्हणजे, २३ मतदारसंघातच, भजापाचे उमेदवार जाहीर होऊ शकले आहेत. त्यांचा मोठा मित्र आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना. त्यांच्याकडे मावळत्या लोकसभेतील १३ खासदारआहेत, पण त्यातील फक्त आठच खासदारांना शिंदे अद्याप उमेदवारी देऊ शकले आहेत. तिसराभाजपाचा मित्र आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वातील गजराचे घड्याळ हे अधिकृत पक्षचिन्ह (अद्याप तरी) मिरवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण त्यांना फक्त शिरूर आणि रायगड इथले दोनच उमेदवार जाहीर करता आले आहेत.त्यातील एक विद्ममान खासदार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे. दुसरे आहेत शिंदे सेनेतून आयात केलेले आढळराव पाटील. तिसरी बारामतीची जागा अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढवतील असे बोलले जात असले तरी त्यांचीही उमेदवारी अद्याप दादांना जाहीर करता आलेली नाही. तिथला सस्पेन्स आणखी काही दिवस राहू दे, असे स्वतः दादाच सांगत आहेत. प्रत्यक्षात हा संभ्रम युक्त संशयपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्याही मनात कायम आहे.
महायुतीला विरोध करण्यासाठी समोरच्या बाजूला प्रामुख्याने महा विकास आघाडी उभी आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवेसना आणि शरदरावांचा राष्ट्रवादी हे तीन्ही पक्ष राज्यात २०१९ नंतर अडीच वर्षे सत्तेत राहिले. पण तरीही गेले चार महिने झगडूनही त्यांना जागावाटपाची बोलणी धड पार पाडता आलेली नाहीत. त्यांच्यात काँग्रेस विरुद्ध ठाकरे, ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि शरदराव विरुद्ध काँग्रेस अशा लढाया सुरुच आहेत. तरीही ठाकरेंनी व काँग्रेसने काही जागांवरील उमेदवाराच्या घोषणा करून टाकलेल्या आहेत, शरदरावांना तेही अद्याप करता आलेले नाही.
सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन मतदारसंघावंरून ठाकरे विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष आता तीव्र झालेला आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील या पैलवानाला ठाकरेंनी उतरवले आहे तर वर्षा गायकवाडांचा दणकट दावा असणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून ठाकरेंनी पक्षाचे सचीव अनिल देसाईंचे नाव जाहीर करून टाकले आहे. कोल्हापूर आणि सांगलीतून आपण जागांची आदला-बदल केली. सबब आता संगली आमची असे ठाकरे म्हणतात ते काही काँग्रेसजनांना मान्य नाही.
कोल्हापुरातून शाहु छत्रपतींचे नाव काँग्रेसने जाहीर केले. तिथे २०१९ ला ठाकरेंचा उमेदवार जिंकला होता. पण सध्या ते धैर्यशील माने हे भाजपा आघाडीत शिंदेसोबत गेले आहेत तरी सेनेचा जागवेरचा हट्ट् कायम होता. आता ते सांगलीचा ह्ट्ट धरून आहेत. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली द्या अशी ठाकरेंची मागणी काँग्रेसने मान्य केलेली नसतानाच तिथे ठाकरे उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले. त्यामुळे आता सांगलीकर काँग्रेसजन खवळून उठले असून आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ अशा चर्चा आता सांगली व दक्षिण मध्य मुंबईबाबत रंगत आहेत. तीच स्थिती भिंवडी बाबत आहे. तिथे ठाकरे लढणार होते. ती जागा ते आता शरद पवारांना देऊ करत आहेत.पण तिथला दावा काँग्रेसने अद्यापी सोडलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातीलच हातकणंगले मतदारसंघाचे काय करायचे हाही मोठा प्रश्न महा विकास आघाडी पुढे उभा आहे. राजू शेट्टी म्हणतात की मलाच तुम्ही सारे पाठिंबा द्या. पण मी तुमच्यात विलीन होणार नाही. माझ्याच चिन्हावर लढणार. तो तिढा कसासोडवायचा हे ठरत नाहीये. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद प्रमाणेच परभणी बाबतबी महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. दावे प्रतीदाव्यांचा गुंता कसा सोडवायचा हे यांना कुणालाच समजत नाहीये. दिल्लीत अमित शहांच्या घरी पहाटे पर्यंत अनेकदा चर्चा करूनही भाजापा मित्रपक्षांचे समाधान करू शकलेला नाही. तर काँग्रेसच्या चिडलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना कसे समजवायचे हे खर्गे, राहुल गांधींना उमजत नाही, अशी एकंदरीत बिकट स्थिती राज्यात दिसते आहे.
या दोघांची ही तऱ्हा असतानाच राजकारणातील तिसरा ध्रुव म्हणून प्रकाश आंबेडकर स्वतःची निराळी राजकीय मांडणी करू पाहात आहेत. त्यांनी आदी महना दोन महिने महा विकासवाल्यां बरोबर चर्चा कणऱ्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी आंबेडकरांनी शिवसेना उबाठा बरोबर वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर केली होती. त्यासाठी ठाकरे स्वतः उठून दादरच्या आंबेडकर भवनात दाखल झाले होते. दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि पुढच्या सर्व निवडणुका आम्ही दोघे एकत्र लढणार हे जाहीर केले. पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा मित्रपक्षां बरोबर सुरु करताना ठाकरेंनी आंबेडकरांना लांब ठेवले. कारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नाही. काँग्रेसलाही आंबेडकरांमुळे मागील लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. त्यांच्या खासदारकीच्या सात जागा प्रकाश आंबेडकरांनी उभ्या केलेल्या वंचित एमआयएम या आघाडीने पाडल्याचा निष्कर्ष काँग्रेसने काढला होता. या वेळी, “कभी गरम, कभी नरम”, अशा चालीवर आंबेडकरांना सोबत घ्यायचे की नाही याच्या चर्चा मविआत सुरु होत्या. अखेरीस आपले काही जमत नाही हे ठरवून आंबेडकरांनी स्वतःसह सात उमेदवार जाहीर करून टाकले. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील या जागा आहेत. शिवाय सांगलीतही त्यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना वंचितचा पाठिंबा जाहीर करून टाकला आहे.
आता याही पेक्षा मोठ्या मांडणीसाठी प्रकाश आंबेडकर हे प्रयत्न करताहेत. त्यांनी एकीकडे मनोज जरांगेनाही सोबत ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, तर प्रकाश शेंडगेंनी नव्याने काढलेल्या पक्षाच्या माध्यमांतून इतर मागस वर्ग व विशेषतः धनगर समाजाला सोबत ठेवण्याची धडपड आंबेडकर करत आहेत. मनसेतून बाहेर पडलेले पुण्यातील समाज माध्यमांचे चमकते सितारे वसंत मोरे यांची भेट आंबेडकरांनी घेतली आहे. पण काय नेमके चालले आहे, हे समजण्यासाठी आणखी दोन दिवस थांबा, इतकेच ते सध्या लोकांना सांगत आहेत. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला गोंधळात गोंधळ याचाच प्रयोग सुरु झालेला दिसतो आहे….!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *