ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई बाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत शहापूर पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च 2024 पर्यंत टँकर ग्रस्त असलेल्या एकूण ९१ गाव पाड्याची माहिती घेतली. पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा असे सांगितले.
गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना सांगितले.
शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूर विकास जाधव, स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड, तसेच पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता शहापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.