पुणे : सायकलिंग खेळात महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी गत पाच वर्षात नेत्रदिपक कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धात महाराष्ट्रचे सायकलपट्टू आपला ठसा उमटवत आहेत ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन बारामतीच्या नवनिर्वाचीत राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा पवार यांनी केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उग्घाटन समारंभानंतर एशियन सायकलिंग कॉन्फडरेशनचे महासचिव श्री ओंकार सिंग, सायकलिंग फेडरेषन ऑफ इडियाचे महासचिव श्री मनिंदर पाल सिंग, उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव तसेच श्री. प्रविण पाटील आदी मान्यवरांस सौ. पवार यांनी ‘जिजाई’वर आमंत्रित करुन चर्चा केली.
दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एकही सराव आणि स्पर्धेसाठी सायकलिंग व्हेलोड्रम नसताना महाराष्ट्राचे सायकलपट्टू आंतरराष्ट्रीय ट्रॅक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असल्याचे याप्रसंगी सीएफआय चे महासचिव श्री मनिंदर पाल सिंग यांनी सांगितले. येथे खूप चांगली गुणवत्ता असून महाराष्ट्रामधील सायकलपट्टूंना योग्य सुविधा व सोयी मिळाल्यास आगामी काळात ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पदक विजेती कामगिरी करतील असा विश्वास श्री ओंकार सिंग यांनी यावेळी व्यक्त केला आणि महाराष्ट्रातील सायकलिंग खेळाच्या हितासाठी या खेळामध्ये सक्रीय होण्याबद्दल सौ. सुनेत्रा पावार यांना विनंती केली. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे श्री प्रताप जाधव यांनी महाराष्ट्रामधील सायकलपट्टूंच्या कामगिरीची माहिती यावेळी सौ. पवार यांना दिली.
येणा-या काळात आपण महाराष्ट्रामधील सायकलिंग खेळामध्ये लक्ष घालू आणि सायकलपट्टूंच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन सौ. सुनेत्रा पवार यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिले. विविध स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनावर आपला भर राहणार असल्याचे सांगून खेळाडूंना अनुभव येण्यासाठी दर्जेदार राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन करण्यावर त्यांनी भर दिला. सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या वतीने स्मृतिचीन्ह देऊन सौ. सुनेत्रा पवार यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
