तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या नेतृत्वाखाली बचाव टीमने केलं कार्य
अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत तालुक्यातील मुद्रे खुर्द येथील आदिवासी तरुण महेंद्र पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला. पोहता येत असल्याने उल्हास नदीला पूर आलेला असताना देखील जिद्दीने नदीतून वाट काढत झाडाची मदत घेतली आणि तेथे तग धरून थांबून राहिला त्यानंतर अपघातग्रस्त मदतीसाठी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या नेतृत्वाखालील या रेस्क्यू टीम ने महापुराने वाहत्या पाण्यात उतरून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले.
कामानिमित्त घराबाहेर पडलेला कर्जत मुद्रे- खुर्द गावातील आदिवासी तरुण महेंद्र पवार हा पाण्यात कोसळला. उल्हास नदीचे पात्रात बेंडसे येथे हा तरुण वाहत जात असल्याचे नदीच्या कडेला महापूर पाहण्यास आलेल्या स्थानिकांनी पाहिले. सर्वत्र आरडाओरड सुरू असताना हा तरुण जिद्दीने महापूर आलेल्या उल्हास नदी मधून वाट शोधण्याचा प्रयत्न करीत होता.पोहता येत असल्याने हा तरुण चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या नदी मधून वाट काढत बेंडसे गावाजवळ नदी मधून एका बाजूला पोहचला. त्यावेळी नदीचे कडेला उभे असलेल्या शेकडो लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते.मात्र आजूबाजूला पाणी असताना न डगमगता त्या तरुणाने नदीच्या कडेला वाढलेल्या झाडांचा आसरा घेतला.त्यामुळे आजूबाजूला पाणी असून तो पुढे वाहून गेला नाही. ही माहिती मिळताच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांचा मदतीसाठी रेस्क्यु टीम ला पाचारण केले.या टीम चे सदस्यांनी गुरुनाथ साठलेकर यांच्या नेतृत्वाखाली किमान ३०० मिटर आत जावून झाडाच्या साहाय्याने पुरातून वाचण्याचा प्रयत्न करीत असलेल्या त्या तरुणाला बाहेर सुरखरुप काढले.नदी बाहेर आल्यावर वाहून जाणारा तरुण महेंद्र पवार यांने माझ्या घरी सर्व रडत असतील मात्र या ठिकाणी खोपोली येथून आलेल्या टीम ने मला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या हे कधीही विसरू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, संजय गांधी निराधार योजना शाखा नायब तहसीलदार आशा म्हात्रे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, कर्जत मंडळ अधिकारी सुनिल मोरे, चिंचवली मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी दत्ता ठोकळ ( सजा पळसदरी), तलाठी माधुरी पाटील (सजा किरवली) आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
0000
