पनवेल-
कळंबोली येथील अमर रुग्णालयावर गर्भपात आणि गर्भवती मातेच्या मृत्यूचे आरोप झाल्यानंतर रुग्णालयातील कारभाराविषयी संशय निर्माण झाला होता. मावळ येथील तिहेरी हत्याकांडामधील महिलेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने हे रुग्णालय तातडीने बंद करण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात होती. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमर रुग्णालय तातडीने बंद करण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. विविध आरोप अमर रुग्णालयावर होत असल्याने या रुग्णालयाची चौकशी पनवेल महापालिकेने केल्यानंतर या रुग्णालयाच्या कामात होणारी अनियमीतता महापालिकेच्या ध्यानात आली. पालिकेच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा १९४९ अंतर्गत अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी रात्री उशीरा घेतला.
चार महिन्यांपूर्वी एका प्रसुती दरम्यान मातेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल महापालिकेने डॉ. अर्जुन पोळ यांची व रुग्णालयातील कारभाराची चौकशी केली होती. चौकशी अंती रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल (अॅडमीट) करुन घेऊ नये, अशा सूचनांची नोटीस बजावली होती. पालिकेचे आदेश झुगारुन डॉ. पोळ हे रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करतच होते. अमर रुग्णालयामध्ये ६ ते ९ जुलै या दरम्यान मावळ येथील पीडीतेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने नवीन रुग्ण दाखल करुन घेऊ नये, अशा पालिकेच्या सूचना डॉ. पोळ पाळत नाहीत हे उघड झाले. तसेच रुग्णालयात पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतर नियमाप्रमाणे न्याय वैद्यकीय प्रकरण म्हणून पोलीसांना संबंधित मृत्यूची माहिती देणे बंधणकारक असताना डॉ. पोळ यांनी शवविच्छेदन झाल्यास गर्भपाताचे प्रकरण उघड होईल यासाठी मृत्यूची माहितीच स्थानिक पोलीसांपासून दडवून पीडीतेचा मृतदेह तीला रुग्णालयात घेऊन आलेल्यांच्या ताब्यात मृतदेह दिला. डॉ. पोळ यांनी सरकारी आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक या पदांवर कर्तव्य बजावले आहे. त्यांना सरकारी सर्व नियम माहिती असतानाही पोलीसांपासून पीडीतेच्या मृत्यूची माहिती दडवल्याचे पालिकेच्या चौकशीत समोर आले आहे. पोलीसांप्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागाला सुद्धा डॉ. पोळ यांनी कळविले नाही. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यानूसार रुग्णांची नोंदवही, रुग्णांच्या केलेल्या तपासण्या, रोगनिदान याबाबतची माहिती पालिकेला कळविली नाहीत. त्यामुळे पनवेल पालिकेने रुग्णालयाला दिलेले नोंदणी प्रमाणपत्र वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणीकृत प्रमाणपत्र तसेच पालिकेने दिलेले इतर परवाने रद्द करत असल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी यांनी आदेशात म्हटले आहे. यानंतर अमर रुग्णालयात कोणताही नवीन रुग्ण दाखल करुन त्यांच्यावर उपचार करुन घेता येणार नाही. परंतू पालिकेच्या आदेशानंतर अमर रुग्णालयाने या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असे पालिकेने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *