खर्डी : चार ते पाच वर्षांपासून शहापूर तालुक्यातील धबधब्याच्या पाण्यात ठिकठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या वर्षी खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील धबधब्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला आहे. सध्या प्रसिद्ध अशोका धबधब्यावर वन विभागाने गेटवर कुलूप लावून जाण्यास बंदी केल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी लहान-सहान रोजगार करून पोटाची खळगी भरणाऱ्या स्थानिकांवर हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. या धबधब्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. हे धबधबे जर दरवर्षी पावसाळ्यात बंद असतील, तर कोट्यवधी रुपयांचा खर्चाचा उपयोग फक्त ठेकेदारासाठीच केला जातो का?असा सवाल रहिवाशांसह पर्यटकांनी केला आहे. सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करून धबधबे खुले करावेत, अशी मागणीही केली जात आहे.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या धबधब्यावर पर्यटक वळू लागले आहे. पर्यटनास वाव मिळावा, यासाठी तालुक्यात पर्यटन विकास अंतर्गत आणि काही ठिकाणी वन विभाग निधीच्या माध्यमातून धबधबे आणि धरण, तलाव, नदी क्षेत्र परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले आहेत. मात्र, आजही शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, आजा पर्वत, सापगाव, डोळखांबचे डोंगर, दहिगाव, माहुली धबधबा व अशोका धबधबा या ठिकाणच्या पावसाळी सहलीला सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. परंतु, येथील धबधबे सरकारने बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करून मागे फिरत आहेत. तर काही पर्यटक छुप्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांना आणि पोलिसांना गुंगारा देऊन धबधब्यावर जात आहेत. वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पर्यटनबंदी केल्याने स्थानिक रहिवासी, बेरोजगार तरुण व पर्यटक संताप व्यक्त करत आहेत.
, ठाणे व नाशिकरांसाठी प्रसिद्ध असलेला अशोका धबधबा बंदीमुळे पर्यटक हेलपाटे मारत आहेत. या ठिकाणी अनेक हिंदी चित्रपटाच्या शूटिंग झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येऊन धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असतात. आता कुठे येथे पर्यटनासाठी पर्यटक येऊ लागलेत; पण धबधब्यांचे गेट बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन इतरत्र रस्त्यावर मजा लुटत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी विहिगाववासीयांच्या मेजवाणीला पसंती होती. काही पर्यटक वीकेण्डच्या शनिवारी मुक्कामी यायचे. अशा वेळी कुणी चुलीवरचे शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवून द्यायचे. कुणी वडापाव, तर कुणी कणसे विकून रोजगार मिळवत होता. त्यामुळे किमान चार महिने तरी रोजगारासाठी बाहेर पडायची गरज नव्हती. या बंदीमुळे पावसाळी हंगामातील रोजगार बुडाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *