ऐरोली खाडीकिनारा स्वच्छ करत लोकसहभागातून
नवी मुंबई : युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजी जगभरात ‘खारफुटीच्या पर्यावरणशील संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ऐरोली सेक्टर 10 येथील खाडीकिनारी विद्यार्थी व नागरिकांच्या सहयोगातून खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाकरिता खाडीकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून माझी वसुंधरा अभियानाचेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विस्तृत असा खाडीकिनारा लाभला असून त्याची स्वच्छता रहावी व त्याचा उपयोग खाडीकिना-यांच्या पर्यावरण संरक्षणाला व्हावा या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून ऐरोलीचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक अहिरे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतिश सनदी व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून या विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह वनशक्ती स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख श्री.विकी पाटील व त्यांचे सहकारी तसेच घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
या खाडीकिना-याच्या विशेष स्वच्छता मोहीमेत 60 गोणी प्लास्टिक बाटल्या, प्रतिबंधात्मक प्लास्टिक, चपला तसेच तत्सम कचरा गोळा करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे खारफुटी जतन व संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यात आले.
००००
