सदीप चव्हाण

मिशन ऑलिम्पिक

आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर आणि दिडशे कोटी भारतीयांना असाच आजचा एतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी मनू बाकरने स्वप्नवत कामगिरी करीत ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडल जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे आजवरचे हे पहिले मेडल ठऱले. मेडल जिंकल्यानंतर अभिमानाचे… आनंदाचे अश्रू पुसण्यासाठी मनू भाकरने जेव्हा हात पापण्याजवळ नेले तेव्हा अवघ्या भारतीयांचे अश्रू त्यात मिसळेले होते.. अवघे अश्रू एक झाहले होते…

मला आठवतेय तब्बल २४ वर्षापुर्वी महाराष्ट्राच्या अंजली भागवतने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये शुटींगची फायनल गाठत तमाम भारतीयांना ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न दाखविले होते. त्यानंतर २० वर्षापुर्वी सुमा शिरुरने ऑलिम्पिकमध्ये महिला शुटींगमध्ये शेवटची फायनल गाठली होती. गेली २० वर्ष भारतीय महीला शुटर्सने पाहिलेले स्वप्न आज अखेर मनू बाकरने पुर्ण केले. अंजली भागवत, सुमा शिरुर आणि दीपाली देशपांडे या त्रयींने रचलेल्या पायावर मनू बाकरने आज कळस बांधला.

मनू बाकरचे रौप्यपदक अवघ्या ०.०१ फरकाने हुकले पण मेडल जिंकून तिने इतिहास घडविला. मनू बाकरला मी सगळ्यात आधी टोकीयो ऑलिम्पिकला पाहिले होते. १८ वर्ष सरलेली एक अल्लड मुलगी तीच्यात दडली होती. पण आज पॅरिसमध्य मनू भाकरचे प्रगल्भ रुप पहायला मिळाले. मोक्याच्या क्षणी दडपण जुगारण्याचे तीच कौशल्य वादातीत आहे. अर्थात तिच्या या यशात जसपाल राणाचे योगदान खूप मोठे आहे. गंमत पहा. नेमबाजीत भारताला पहिली ओळख करून दिली ती जसपाल राणाने. त्याने  वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड करीत २५ मीटर पिस्तुल प्रकारात गोल्ड मेडल जिंकले होते. पण त्याच्या दुर्दैवाने त्यावेळी पिस्तुल प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला नव्हता. त्याने एशियन गेम्स, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धेत पदकांची लयलूट केली. पण ऑलिम्पिक मेडल काही तो जिंकू शकला नाही. आज तो कोच असणाऱ्या भारताच्या महिला खेळाडूने भारतासाठी ऑलिम्पिकचे पहिलेवहीले मेडल जिंकत गुरुला अनोखी मानवंदना दिली. जसपाल तसा स्पष्टवक्ता आणि करारी आहे. पण या एतिहासिक मेडलचे आनंदाश्रू पापण्याआड दडवण्यात तो कमी पडला हेच खरे. त्याच्या आजवरच्या संघर्षाचा यापेक्षा उत्तम फलित असूच शकत नाही.

टोकीयोतील मनू भाकर पॅरिसची परी ठरलीय. तिच्यातील अमुलाग्र बदल थक्क करणारा आहे. आपल्या विजयाचे श्रेय तीने आपले गुरु जसपाल राणा आणि भगवत गीतेला दिले आहे. कृष्णाने अर्जुनाला दिलेला कर्म कर फळाची अपेक्षा बाळगू नकोस हा संदेश तीने स्वता आचरणात आणलाय. वेळ मिळेल तसे ती गीता वाचते आणि हो आम्ही पत्रकारांनाही तीने गीता वाचण्याचा सल्ला दिलाय. इतकेच नव्हे तर ऑलिम्पिकची तयारी करताना तीने स्वतावर एक बंधन घालून घेतले होते. की जेवढे पॉईंट विजयासाठी ज्या देशात कमी पडतील तेवढ्या रकमेच त्या त्या देशातील चलनात विविध आश्रमांना आणि गोशाळेला दान करायचे. या दान पुण्यातून ती स्वताला कणखर बनवत गेली. आणि आज तीने एतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. चंद्रावर निल आर्मस्ट्राँगनंतर अनेकजणांनी चढाई केली पण लक्षात राहीला तो पहिल्यांदा चढाई करणार नील आर्मस्ट्राँग. तसेच यापुढे महिलांच्या नेमबाजीत ऑलिम्पिकमध्ये अनेकजण मेडल जिंकतील. पण ऑलिम्पिकचे पहिले मेडल जिंकणारी मनू भाकर हा किताब तिच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही.

मनू आम्ही सारेजण तुझे आभारी आहोत. हा एतिहासिक क्षण आम्हास अनुभवायला दिलास आणि माझ्यासाठी तर खासच आहे कारण माझे हे सहावे ऑलिम्पिक आहे. आणि भारताने आजवर जिंकलेल्या शुटींगमधिल सर्वच्या सर्व पाच मेडलचा मी साक्षीदार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *