ठाणे : पर्यांवरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठामपा शाळा क्र. १९, विष्णुनगर, नौपाडा येथे आयोजित केलेल्या हे प्रदर्शन ४ ऑगस्टपर्यत सुरू राहणार आहे.
खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी (२७ जुलै) या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपआयुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते व प्रदुषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.  शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबविताना नागरिकांनी पर्यावरणस्नेही सजावटीचे साहित्य पाहता यावे व सुलभ खरेदी करता यावे हा या प्रदर्शनाचा उदात्त हेतू आहे. शाडू माती, लाल माती व गायीचे शेण, पुठ्ठयाचा लगदा, शेतातील माती व झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक गणेशमूर्ती हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. या व्यतिरिक्त चटईपासून बनविलेले सजावटीची साहित्य, पर्यावरणस्नेही मखर, कापडी मंडप झालर, फायबरपासून तयार केलेले चलचित्रे या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण २५ स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देवून हा उपक्रम यशस्वी करावा, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरणस्नेही मूर्ती व सजावटीच्या साहित्याचा वापर करुन जलप्रदुषण रोखण्यास पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
-0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *