निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी – ॠता आव्हाड

 

 

ठाणे : निवडणुका जवळ आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी, असे मत ठाणे व पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांनी व्यक्त केले.
अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असे जाणवले की पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या तपासाकडे पाहता त्यांची कीव येते. निवडणुका जवळ आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी. अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशश्रीचा मारेकरी मोकळा आहे. त्यालाही जेरबंद करावे आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर सुजाता घाग यांनी, या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. जेणेकरून दुसर्‍या कुणाची असे गुन्हे करण्याची हिमंत होणार नाही असे ठाणे – पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर तीन पुजार्‍यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली. तर उरण येथे एका यशश्री शिंदे या तरूणीची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे – पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड, ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत नसल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या आंदोलनात मा. नगरसेविका अपर्णा साळवी, आरती गायकवाड, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी, मनिषा करलाद, माधुरी सोनार, प्रियांका सोनार, विधानसभाध्यक्षा साबिया मेनन यांच्यासह महिला पदाधिकारी , कार्यकर्त्या आणि जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, गजानन चौधरी, सचिन पंधेरे, हिरा पाटील आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *