नवी मुंबई : महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादी व्यतिरिक्त ज्या इमारती प्रथमदर्शनी धोकादायक दिसून येत आहेत अशा इमारतींना नोटीसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे सूचित करावे तसेच अनधिकृत बांधकाम विरोधात धडक मोहीम हाती घ्यावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शहाबाज येथील दुर्घटनेतील आपद्ग्रस्त नागरिकांना आग्रोळी येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आले असून त्याठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्याची काळजी घ्यावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला नवी मुंबईतून अधिक प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने व्यापक जनजागृती सुरुच ठेवावी असे निर्देश देतानाच आयुक्तांनी आजतागायत प्राप्त 42 हजार 461 अर्जांच्या तपासणी कामाला वेग दयावा अशा सूचना दिल्या. जिल्हा महिला व बालविकास विभागाशी संपर्कात राहून या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून घ्याव्यात व या आठवडयाभरात प्राप्त अर्जांची तपासणी पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश समाजविकास विभाग तसेच आठही विभाग अधिकारी यांना देण्यात आले.
नागरिकांशी निगडीत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याची कार्यप्रणाली तत्परतेने अंमलात आणावी असे सूचित करतानाच पहिल्या टप्प्यात सुरु होणाऱ्या 38 सेवा महानगरपालिकेच्या पोर्टलवरुन ऑगस्टमधेच सुरु व्हाव्यात असे आयुक्तांनी निर्देश दिले. पेमेंट गेटवेची सुविधाही उपलब्ध करुन देण्याबाबत गतीमान कार्यवाही करावी व त्याची नागरिकांमध्ये व्यापक प्रसिध्दी करावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत असावेत यादृष्टीने त्या ठिकाणची सुधारणा कामे जलद करण्यात यावीत तसेच गटारे अथवा नाले सफाई केल्यानंतर तेथील गाळ त्वरित हलवावा असेही स्पष्ट निेर्देश देण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची बारकाईने पाहणी करून तेथील आवश्यक दुरुस्त्या तातडीने करुन घ्याव्यात व त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच प्रत्येक विभाग कार्यालयाकडे 10 सीट्सचे मोबाईल टॉयलेट असावेत असे नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती तसेच शासनामार्फत विविध नागरी सुविधा कामांसाठी उपलब्ध होणारा निधी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुविधा कामांसाठी प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावेत व प्राप्त होणारा शासकीय निधी पूर्णपणे वापरला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी असे आयुक्तांनी सूचित केले. अमृत 2, पंधरावा वित्त आयोग या शासकीय योजनांतर्गत सुरु असलेली कामे विहीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
नागरी सुविधा कामांची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने अभियंते व कंत्राटदार यांची संयुक्त प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करावी व त्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दयावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
गणेशोत्सव कालावधी जवळ येत असून नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने शाडूच्या मूर्तींचे पूजन करण्याबाबत आवाहन करावे तसेच महानगरपालिका तयार करीत असलेल्या कृत्रिम तलावांचा मूर्ती विसर्जनासाठी वापर करावा याबाबत आत्तापासूनच व्यापक जनजागृती करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
पावसाळी कालावधी असल्याने शहर स्वच्छतेकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देशित करीत नागरिकांकडून वर्गीकरण करुनच कचरा दिला जावा याकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार तसेच सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी उपस्थित होते.
000
