ठाणे : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नवी मुंबईचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे. त्‍यातच सर्वात जास्त वाहतुकीची वर्दळ असलेल्या ठाणे- बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

त्‍यामुळे ऐन उकाड्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या मार्गावरून बेलापूरहून ठाण्याकडे जाताना नेरूळ पार केल्‍यानंतर शिरवण्यात गावाकडे जाणाऱ्या आणि पुलावर चढणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यापासून दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तिथून पुढे सानपाडाजवळ वाशीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे.

त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, त्याच्याच बाजूला एक नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुलावरून वाशीकडे जाता येते. मात्र, तुर्भे रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे.

येथे पूल उभारण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानकासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाशी मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्थानकाच्या आतील रस्त्याचा पर्यायही खुला करून देण्यात आलेला आहे. शिवाय वाहतूक पोलिसही भर उन्हात उभे असतात. मात्र, तरीदेखील येथील मार्गावरील वाहतूक कोंडी काही कमी होत नसल्‍याचे चित्र आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्थानक पार केल्यावर पुढे असलेल्या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. येथील मार्गावरील महापे जंक्शनवरही मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत.

त्यामुळे अर्धा मार्ग रस्त्याच्या कामामध्ये बंद आहे. महापे जंक्शनवरून अनेकांना शिळफाटा गाठायचे असते. मात्र, येथील वाहतूक कोंडीमुळे जंक्शनवर बराच वेळ वाया जात आहे. एकीकडे आग ओकणाऱ्या सूर्याच्या गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत असताना ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा जीव नकोसा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *