टपाल विभागाच्या सहकार्याने रेल्वे स्टेशनबाहेर आजपासून शिबीर
ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांना स्वस्त दरातील आरोग्य विमा उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे. टपाल विभागाच्या सहकार्याने आरोग्य विम्याचा लाभ देण्यासाठी रेल्वे स्टेशनबाहेर आजपासून ३ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत विशेष शिबीर सुरू करण्यात आले आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ च्या बाहेर सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आज करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विम्याबरोबरच आधार कार्डची दुरुस्ती व नवे कार्डही दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्री. गौरव अंकोला, प्रभाग अध्यक्ष रोहीत गोसावी, नौपाडा महिला मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले, सई कारुळकर, वैशाली विधाते, विशाखा कणकोसे, अमित वाघचौरे, ज्ञानेश्वर अंदुरे, योगेश गांगुर्डे, मनोज शुक्ला, भारतीय टपाल विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक डॉ. संजय लिये, वरिष्ठ पोस्टमास्तर अमेय निमसूदकर, मार्केटिंग प्रतिनिधी चंद्रशेखर शिंदे आदी उपस्थित होते.
टपाल विभागाने आदित्य बिर्ला आरोग्य विमा कंपनीबरोबर करार करून नागरिकांसाठी अवघ्या ५४९ रुपयांमध्ये १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याची योजना आखली आहे. त्यात अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, रुग्णालय खर्चासाठी ६० हजार रुपये, दोन मुलांचा एक लाख रुपयांपर्यंतचा शिक्षण खर्च, किमान एक ते दहा दिवसांपर्यंत रुग्णालयात दाखल असल्यास प्रत्येक दिवसासाठी एक हजार रुपये, ३० हजार रुपये ओपीडी खर्च, अपघाताने अस्थिभंग किंवा कोमासाठी १ लाख रुपये, कुटुंबाला प्रवासखर्च म्हणून २५ हजार रुपये, अंत्यसंस्कारासाठी ५ हजार रुपये अशा तरतूदी आहेत. १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना वार्षिक ५४९ रुपयांचा हप्ता आहे. या विमा योजनेत सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा धक्का, फरशीवरून घसरून पडणे आदींसाठी संरक्षण देण्यात आले आहे. या विमा योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले यांनी केले आहे.
०००००
