टाटाच्या वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रीसिटीकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या मोनोरेल, मेट्रोसाठी टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात आहे. पण टाटा पॉवरने वीजदरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने वीजपुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका आणि मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) सह मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेसाठी सध्या टाटा पॉवर वीजपुरवठादार आहे. टाटा पॉवरकडून मोनोरेल आणि मेट्रोसाठी सध्या, २०२३-२४ साठी ४.९२ रुपये प्रति युनिट असे दर आकारले जातात. परंतु, टाटाच्या वीज दरात सोमवारपासून वाढ झाल्यामुळे २०२४-२५ साठी मोनोरेल आणि मेट्रोसाठी ७.३७ रुपये प्रति युनिट असे दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने टाटा पॉवरऐवजी अदानीची वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केल्याचे समजते. अदानीकडून वीज घेतल्यास एमएमआरडीएला ६.१५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागेल. एकूणच, अदानीची वीज काहीशी स्वस्तात उपलब्ध होणार असल्याने एमएमआरडीएने वीज पुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो २ अ आणि ८ मार्गिकेसाठी दररोज १२ ते १५ मेगावॉट वीज लागते. तर मोनोरेलसाठी प्रतिदिन २ ते ३ मेगावॉट इतक्या विजेचा वापर केला जातो. दरम्यान, मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून मेट्रोतुनही एमएमआरडीएला अपेक्षित महसूल मिळत नाही. अशावेळी वीज दराचा भार वाढल्यास तोटा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, टाटाऐवजी अदानीकडून वीज घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *