माथेरान : माथेरान या जवळपास चार हजार लोकसंख्या असणाऱ्या पर्यटनस्थळी विविध धर्माच्या स्मशानभूमी आहेत. हिंदूं घटकांची संख्या अधिक असून सदर हिंदू स्मशानभूमी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने पावसाळ्यात मयत नेताना खूपच त्रासदायक बनते. परंतु नुकताच मागील वर्षी मिशन माथेरान ग्रुपच्या माध्यमातून बदलापूर येथील संस्थेच्या वतीने शववाहिनी देणगी स्वरूपात प्राप्त झाल्यामुळे मयताच्या खांदेकर्यांना तुर्तासतरी सुटका मिळाली आहे.
ह्या स्मशानभूमीत काही वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार वेळी लाकडाचा तुटवडा भासू नये यासाठी डिझेल वर चालणारी शवदाहिनीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. सुरुवातीला काही महिने उत्तम सुविधा उपलब्ध झाली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर सद्यस्थितीत ही शवदाहिनी बंद अवस्थेत असल्याने जवळपास लाखो रुपये पाण्यात गेल्यासारखे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. स्मशानभूमी जंगल भागात कड्यालगत असल्याने काहीसा भाग पावसाळ्यात कोसळला आहे. लवकरच यावर उपाययोजना केली नाही तर भविष्यात हळूहळू संपूर्ण भाग कोसळण्याची भीती नाकारता येत नाही.अंत्यसंस्कार करण्यात येणारे शेड जीर्ण झाले असून विशेषतः पावसाळ्यात निवाऱ्याची सोय उपलब्ध नसल्याने तसेच बसण्यासाठी बाके नाहीत त्यामुळे मयताच्या अंत्यसंस्कार वेळी उपस्थितांना पावसात उभे राहावे लागत आहे.सदरची स्मशानभूमी गावापासून खूपच लांब असल्याने ग्रामस्थांनी संबंधित खात्यांना स्मशानभूमी गावाच्या मध्यवर्ती भागात घ्यावी याबाबत अनेकदा लेखी निवेदने दिलेली आहेत.
——————————————————
स्मशानभूमीच्या नूतनीकरण बाबतीत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सर्व अपेक्षित कामांची पूर्तता निश्चितच होणार आहे.
राहुल इंगळे — प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद
——————————————;———–
लाखो रुपये खर्च करून त्या वास्तूचा समाजोपयोगी कार्यास उपयोग न होणे हे तत्कालीन लोकप्रतिनिधीच अपयश आहे.विद्युतदाहीनी सारखे अनेक प्रोजेक्ट जसे की अवकाश केंद्र व कम्युनिटी सेंटर देखील अतिशय चांगल्या संकल्पना असलेली वास्तू आज लोकप्रतिनिधीचा अनास्थेमुळे बंद आहे.जणू काही आलेला निधी फस्त झाला की आपली जबाबदारी संपली ही मानसिकता संपेल तेव्हाच अशा महत्वपूर्ण वस्तूंचे संगोपन बरोबर होईल.
भास्करराव शिंदे —उद्योजक माथेरान
00000