ठाणे : मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकावर लाखोंच्या संख्येने प्रवासी उतरतात. त्यांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने सहा पुलांची निर्मिती केली आहे. आता या संख्येत आणखी एका पुलाची भर पडली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांच्या वापरासाठी खुलाही केला जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा पूल बांधला आहे. या पुलामुळे प्रवाशांची घुसमट कमी होणार आहे.
दादरच्या मागोमाग गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा क्रमांक येतो. दर दिवशी या स्थानकावरून मुख्य आणि उपनगरीय रेल्वेने सुमारे ८० लाख प्रवासी ये- जा करतात. कर्जतपासून अगदी नवी मुंबई, पनवेलपर्यंत आणि कसारा, खोपोलीपासून मुंबईपर्यंत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. हे स्थानक रेल्वेला मोठा आर्थिक हातभार लावणारे आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळायला हव्यात, असा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर आणखी एक नवा प्रवासी पूल बांधला आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असून तो या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना थेट सॅटीसच्या पुलावर नेऊन सोडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सॅटीस पुलावर जाऊन ठाणे, घोडबंदर, काशिमीरा, भाईंदर, बोरिवली आदी ठिकाणी जाण्यासाठी बस पकडणे सोपे जाणार आहे.
हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १० कडून मुख्य पुलावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगाचा ठरणार आहे. हा नवा पूल मुख्य पुलाला जोडला आहे. त्यामुळे मुख्य पुलावरून ठाणे पश्चिमेकडे जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा वापर करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलाचे बांधकाम सुरू होते. आता ते पूर्णत्वास आले आहे. आता त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी जाण्यासाठी एकूण सहा पुलांचा वापर सुरू आहे. आता त्यात सातव्या पुलाची भर पडली आहे. पैकी सहाही पूल थेट सॅटीस पुलाशी जोडले गेले आहेत. स्थानकावर एकूण दहा प्लॅटफॉर्म असून हे सहाही पूल त्यांच्याशी जोडले जाणार आहेत. तर एक पूल सार्वजनिक आहे. त्यामुळे एकाच वेळी स्थानकावर अनेक गाड्या उभ्या राहिल्या तरी त्यातून उतरणाऱ्या गर्दीला या पुलाच्या माध्यमांतून स्थानकाबाहेर पडणे सुलभ होते.
शिड्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. आता काँक्रीटीकरण केलेल्या शिड्या आणि पुलावरील फ्लोअरवर मार्बल ग्रॅनाईटच्या लाद्या बसवण्याचे काम सुरू होणार आहे. येत्या आठ- दहा दिवसांत हा पूल प्रवाशांना वापरण्यायोग्य होईल.
