ठाणे ; गेल्या काही दिवसांत ठाणे व मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गेल्या १५ दिवसांमध्ये पावसाळी आजाराच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, हेपेटायटिस, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांच्या रुग्णांत अधिक वाढ झाली आहे.
जुलैच्या शेवटी पावसाळी आजारांमध्ये कायम वाढ दिसून येत असते. विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे अनेकांना खोकला आणि सर्दीचा त्रास होत आहे. मात्र, त्यांना ताप येत नाही. तर, काहींचा आजार दोन ते तीन दिवसांत बरा होत आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकणी जाणे टाळावे तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीची प्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांनी मास्कचा वापर करावा, असेही पालिकेच्या आरोग्य विभागाने सुचविले आहे. त्याचबरोबर गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील उघडे पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, असा सल्ला दिला आहे.
क्लोरीन टॅब्लेट, लेप्टो प्रतिबंधक गोळ्यांचे वितरण-
आरोग्य विभागाने ६८ हजार ०२१ ओआरएस वितरित केले आहेत. तसेच पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ६९ हजार ८६७ क्लोरीन टॅब्लेट वितरित केल्या आहेत, तर ८४ हजार ११६ लेप्टो संशयित रुग्णांना प्रतिबंधात्मक औषध देण्यात आले आहे. अनेकवेळा रुग्ण ताप आल्यामुळे स्वतः औषधे घेतात. त्यामुळे त्यांनी स्वतःच अशी औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घ्यावीत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
0000