गावदेवी मैदानाजवळून सकाळी बस सुटणार
ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील आय टी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गावदेवी मैदानाजवळून सकाळी व वागळे इस्टेटमधून सायंकाळी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रयत्नाने टीएमटी प्रशासनाने बससेवा सुरू केली असून, दररोज शेकडो नोकरदार तरुण-तरुणींना सुविधा मिळणार आहे.
जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी बसमध्ये तिकीट घेऊन बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी या बससेवेला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वागळे इस्टेटमधील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर आयटी उद्योगांचे जाळे पसरले आहे. या परिसरात आयटी क्षेत्राबरोबरच विविध कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, त्या तुलनेत टीएमटी बससेवा, शेअर रिक्षांची संख्या अपुरी असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणींचा समावेश आहे. वागळे इस्टेटकडे जाणारे कर्मचारी सकाळी कामावर जाण्याच्या वेळी बी-केबिन, अमृता हॉटेल परिसरात रस्त्यावर उभे राहतात. एखादी शेअर रिक्षा आल्यानंतर त्यात जागा मिळविण्यासाठी धावपळ उडत असते. त्यातून अपघात होण्याची भीती व्यक्त होत होती, या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी टीएमटी व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांची भेट घेऊन गावदेवी बस स्टॉपवरून वागळे इस्टेटकडे सकाळी ८ ते १० आणि वागळे इस्टेटहून सायंकाळी ५ ते ८ दरम्यान रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या जादा बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर आज या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.
या बससेवेमुळे टीएमटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचबरोबर दररोज शेकडो आयटी कर्मचाऱ्यांची सोय होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली.
00000