मावळ,रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार – अवधूत वाघ

राज भंडारी

पनवेल : मित्र पक्षांसहित देशात ४०० हून अधिक जागा भाजपा निवडून आणणार तसेच मावळ, रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

६ एप्रिल रोजी भाजपा आपला ४४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने बुथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ आजपासून सगळीकडे केला आहे, या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील तसेच प्रकाश बिनेदार उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना अवधूत वाघ म्हणाले, जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. बुथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर भाजपा कार्यकर्ता जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य सरकारने केलेली विविध कामे, विकास योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, आंतरराष्ट्रीय ख्याती या माहिती सोबतच प्रत्येक घरोघरी विविध योजनांच्या लाभार्थींना भेटून घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबद्दल आभार मानले जाणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मते पडली पाहिजेत यासाठी बुथवर कार्यकर्ते मेहनत घेणार आहेत, अशी शेवटी प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

भाजपच्यावतीने ४०० पार चा नारा देणाऱ्या अजेंड्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपला गोचीत पकडले असून इंडिया आघाडीच्यावतीने भाजपकडून संविधान बदलविण्यासाठी ४०० पारचा नारा देण्यात येत असल्याच्या आरोपावरून अवधूत वाघ यांनी उत्तर देताना सांगितले की, गेल्या ७० वर्षांमध्ये अनेक बदल घडले आहेत, त्यानुसार घटनेमध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे. लोकसभेत २/३ संख्याबळ असल्यामुळे तत्कालीन राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने देखील काही बदल केले होते. त्यानुसार पुन्हा काळ बदलत चालला आहे. या बदलत्या काळानुसार घटनेत काही तरतुदी करणे गरजेचे असल्यामुळे भाजपची देखील ती तयारी सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून संविधान बदलण्याची खोट्या स्वरूपाची भाषा केली जात आहे, तर संविधान बदलण्याची कोणाच्या बापामध्ये हिम्मत नाही, असे उत्तर देत उपस्थित झालेल्या या प्रश्नाला अवधूत वाघ यांनी पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *