संदीप चव्हाण

सुशील कुमारने जेव्हा लंडनमध्ये कुस्तीत सिल्व्हर मेडल जिंकले तेव्हा अमन अवघा नऊ वर्षांचा होता. सुशीलची कुस्ती पाहून आपणही मोठेपणी कुस्तीत ऑलिम्पिकचे मेडल मिळवायचे असा बालहट्ट त्याने आपल्या आईवडिलांकडे धरला… मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी हरयानातील प्रसिध्द छात्रसालमध्ये दहा वर्षाचा अमन कुस्तीचा श्रीगणेशा करण्यासाठी दाखल झाला. परिकथेसारकी ही झाली सुरुवात… कारण दुख:  अमनवर झडप घालण्यासाठी दबा धरुन बसले होते. वयाच्या ११ व्या वर्षी दुर्धर आजाराने आधी वडील आणि काही महिन्यात आईचेही निधन झाले. अमन पोरका झाला. वयाच्या अकराव्या वर्षी आई-वडीलांचे छत्र हरवण्याचे दुख मी कालही अमनच्या चेहऱ्यावर वाचत होतो. पापण्याआडच्या अश्रुत आईवडीलांच्या आठवणींचा हिंदोळा दाटून आला होता. अमन बोलत होता… सरजी आजभी मुझे उनकी कमी महसूस होती है. आजकी मेरी यह ऑलिम्पिक जित देखने के लिए मेरे माता पिता चाहिए थे…

अमनचा कातर झालेला आवाज आपल्या हृदयाला पिळ पाढतो. आई वडीलांचे छत्र हरपल्यावर अमनने छत्रसाललाच आपले घऱ बनवले. कुस्तीची माती त्याची आई बनली. ‘माता’ ते ‘माती’ या शब्दात फरक फक्त वेलांटीचा आहे. माता जीने अमनला जन्म दिला. आणि माती जिने आपल्या अंगाखांद्यावर अमनला खेळवले. कुस्तीचे धडे दिले. याच मातीत तो पडला… सावरला…खरचटला. मातीने त्याला मातेची ममताही दिली. आज अमनने पॅरिस मध्ये ५७ किलो वजनी गटातील ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडल जिंकून ‘माता’ आणि ‘माती’ दोघांचेही ऋण फेडले. वेलांटीचा हा प्रवास आता काही क्षण पॅरिसमध्ये विसावलाय. “सरजी यहा रुकना नही है. अभी तो देश के लिए ऑलिम्पिकका गोल्ड जितना है. बस यही अब मकसद है…”. अमनच्या बोलण्यात आजही एक लहान मुल दडल्याचे सारखं जाणवत राहते. भारताचे कुस्तीतील हे आठवे मेडल आहे. त्यात सुशीलच्या १ सिल्व्हर आणि सात ब्राँझ मेडलचा समावेश आहे. अमनचा धडाका आणि वय पहाता तो आगामी २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये नक्की गोल्ड मेडलला गवसणी घालू शकेल.

अमन भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात लहान वयात मेडल जिंकणारा खेळाडू ठरलाय. वयाच्या २१ वर्ष आणि २४ व्या दिवशी त्याने ऑलिम्पिकचे मेडल जिंकले आहे.

अमनमधिल गुणवत्तेला पैलू पाडले ते छत्रसालमधिल त्याचे गुरु ललित कुमार यांनी. २०२१ मध्ये अमनने पहिल्यांदा कुस्तीची राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. त्यानंतर २०२२ मध्ये २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत अमनने गोल्ड मेडल जिंकले. या स्पर्धेतली भारताचे आजवरचे हे पहिलेच गोल्ड मेडल होते. त्यानंतर झालेल्या एशियन गेम्समध्येही अमनने ब्राँझ मेडल जिंकले. त्यानंतरच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत अमनने गोल्ड मेडल कमावले.

आक्रमक कुस्ती ही अमनची खासियत आहे. या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल विजेत्या जपानच्या खेळाडूविरुध्द त्याला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. पण ब्राँझ मेडल मिळवताना बाकी सर्व लढती या अमनने मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. अमनचा हा आक्रमक पणाच त्याला यशोशिखरावर घेऊन जातोय.

पॅरिसच्या ऑयफेल टॉवरच्या पायथ्यापाशी हे कुस्तीचे स्टेडियम उभारण्यात आलेय. मेडल जिंकल्यानंतर एका फोटोसाठी अमनला विनंती केली. मी मोबाईल झटपट मित्राकडे दिला. फोटो काढला गेला. योगायोग पहा जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आयफेल टॉवरच्या पार्श्वभुमीवर हा फोटो काढला गेला होता. फोटो पहाताना अमनचे यश मला आयफेल टॉवरपेक्षा उंच जाणवलं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *