मुरबाड न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन
राजीव चंदने
मुरबाड : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुका विधी सेवा समिती तर्फे तालुक्यातील खुटल (बा.) येथील शासकीय आश्रमशाळेत कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुरबाड दिवाणी व फौजदारी न्यायायलाचे न्यायाधीश एस. बी. शिरसाठ यांनी अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना न्यायाधीश एस. बी. शिरसाठ यांनी विविध प्रकारच्या होणाऱ्या अन्यायाला कायदे विषयक ज्ञाना अभावी कुठेही वाचा फोडली जात नसल्याची खंत व्यक्त करून यासाठी कायद्यांच्या अभ्यासाची गरज विशद केली. अशावेळी पोलीसांची मदत घ्यावी, मात्र पोलिसांनी मदत न केल्यास प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या न्यायालयातील विधी सेवा समिती तर्फे मोफत कायदेशीर मदत केली जात असल्याची मोलाची माहिती देऊन भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील आदिवासी लोकसंख्येच्या आकडेवारींवर प्रकाश टाकला. तसेच विनापरवाना वाहन ड्रायव्हिंग समवेत पोक्सो कायदा व बालविवाह यावर विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी न्यायाधीश शिरसाठ यांचे समवेत मुरबाड बार संघटनेचे नवनियुक्त अॅड. अध्यक्ष संतोष पोतदार, अॅड. प्रमोद भोईर, अॅड. ज्योत्स्ना घरत, अॅड. वनिता हिंदुराव, अॅड. अश्विनी पटणी, अॅड. मधे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
00000
