यवतमाळ राजकारणातील समीकरणे सतत बदलत असतात. त्यामुळे अनेकदा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र, आपण कोणावर अन्याय होवू देणार नाही आणि भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यवतमाळ येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार भावना गवळी आणि हेमंत पाटील यांचे तिकीट कापल्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याने या दोन्ही नाराज खासदारांचे भविष्यात राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमदेवारचा तिढा राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केल्यानंतरच सुटला. मुख्यमंत्री यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचेपर्यंत उमेदवार बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राजश्री पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सर्व चर्चांना विराम मिळाला. पूर्वीच्या नियोजनानुसार, मुख्यमंत्री व महायुतीचे नेते येथील पोस्टल मैदानात आयोजित सभेस संबोधित करून राजश्री पाटील यांचा नामांकन अर्ज दाखल करणार होते. मात्र मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा विलंबाने दाखल झाल्याने दुपारी अडीच वाजता ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पाहोचले व राजश्री पाटील नामांकन अर्ज दाखल करताना उपस्थित राहिले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, नीलय नाईक यांच्यासह महायुतीचे आमदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातून पोस्टल मैदानात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या लेकीला येथून उमेदवारी दिल्याने तिला माहेरचे लोक नाराज करणार नाहीत. तिला विजयाचा परतावा देतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राजश्री पाटील या धडाडीच्या वक्याास आणि धडाकेबाज कामासाठी ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीच खासदार व्हायला हवे होते. मात्र आता त्यांच्या रूपाने यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ही निवडणूक देशासाठी महत्वाची असून देशात चारशे पार तर महाराष्ट्रात ४५ पार होतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीकडे कोणताही झेंडा किंवा विकासाचा कोणताही अजेंडा नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. कट, कमिशन आणि करप्श्न हा विरोधकांचा गुणधर्म आहे, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील महायुती निती, निर्णय आणि नियत या भरवशावर जनतेमध्ये लोकप्रिय आहे, असे ते म्हणाले. महायुतीच्या आमदारांचे काम, पालकमंत्री संजय राठोड यांच्या कामाचा धडाका, भावना गवळी यांनी केलेली विकासकामे या भरवशावर राजश्री पाटील यांना मतदार स्वीकारून विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भावना गवळी व हेमंत पाटील यांचे काम चांगलेच होते. मात्र राजकारण म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. परंतु, गवळी व पाटील यांना दिलेला शब्द पाळू व त्यांना योग्य सन्मान देवू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी जन्मभूमीला कर्मभूमी करण्याची संधी महायुतीतील नेत्यांनी दिली, याबद्दल आभार मानले. आपण बँकर असल्याने जनता जितके मतरूपी आशीर्वाद देईल, त्याच्या दुपटीने विकासकामांचा परतावा करू, असे त्या म्हणाल्या. पालकमंत्री संजय राठोड यांनी महायुतीसोबतच जिल्ह्यातील जनता राजश्री पाटील यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद लावून, त्यांना निवडून आणतील, असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त् केला. याप्रसंगी महायुतीतील नेत्यांचीही भाषणे झाली. संचालन पराग पिंगळे यांनी केले. सभेला दहा हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांचा ‘करेक्ट गेम’ करू!

आपल्यावर प्रधानमंत्र्यांचा एजंट असल्याचा आरोप होतो. मात्र, आपण परदेशात देशाची बदनामी करणाऱ्या पक्षाचे नव्हे, तर राष्ट्रहीत जोपासणाऱ्या पंतप्रधानांचे एजंट असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला. मी ‘फेसबुक लाईव्ह’वाला मुख्यमंत्री नसून ‘फेस टू फेस’ काम करणारा ‘सीएम’ अर्थात ‘कॉमन मॅन’ आहे, अशी कोटी त्यांनी केली. विरोधकांना आपण त्यांचा ‘करेक्ट गेम’ करू अशी कायम भीती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *