नवी मुंबई : नवी मुंबईच्या स्वच्छतेमधील मानांकनात दैनंदिन शहर स्वच्छतेसाठी अथक कार्यरत असणा-या स्वच्छताकर्मींचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मनात असलेली आपुलकीची भावना अभिव्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींकडून स्वच्छतामित्रांना रक्षाबंधन असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या राख्यांमध्ये विविध फळे व भाज्यांच्या बिया होत्या. त्यामुळे निसर्ग रक्षण व संवर्धनाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली 20 महानगरपालिका शाळांमध्ये हा ह्रद्य उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये आठही विभाग कार्यालयांचे स्वच्छता अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक व विस्तार अधिकारी सहभागी झाले होते.
शाळांमध्ये स्वच्छतामित्रांचे स्वागतगीत म्हणून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत शहरामध्ये स्वच्छतेचे काम करून सर्व नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत करणाऱ्या प्रातिनिधीक 50 सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी राख्या बांधून बंधुभावाचा संदेश दिला. 1 हजारहून अधिक स्वच्छतामित्रांना राख्या बांधण्यात आल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 6 व शाळा क्रमांक 112 करावेगाव, नेरूळ विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 92, शाळा क्रमांक 11 व शाळा क्रमांक 121 कुकशेत, तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 20 व शाळा क्रमांक 107 तुर्भेगाव, तसेच वाशी विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 28 व शाळा क्रमांक 110 वाशी सेक्टर 15, त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 36 व शाळा क्रमांक 122 कोपरखैरणे गाव, तसेच घणसोली विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 76, शाळा क्रमांक 42 व शाळा क्रमांक 105 डी मार्टजवळ घणसोली, तसेच ऐरोली विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 48 दिवा, शाळा क्रमांक 91 व शाळा क्रमांक 120 काचेची शाळा आणि दिघा विभाग कार्यालय अंतर्गत नमुंमपा शाळा क्रमांक 55 व शाळा क्रमांक 104 राजश्री शाहू महाराज विद्यालय अ शाळा क्रमांक 55 राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 104 राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 78 गौतम नगर आणि शाळा क्रमांक 78 गौतम नगर अशा 20 नमुंमपा शाळांमध्ये रक्षाबंधनाचा असा आगळावेगळा उपक्रम प्रथमच करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्वच्छता आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे पटवून देत स्वच्छता कामगारांच्या अमूल्य कामाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ओल्या कचरा, सुका कचरा, घातक कचरा याचे वर्गीकरण कसे करावे तसेच शून्य कचरा याबाबत माहिती देण्यात आली.
उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये स्वच्छतेविषयक जाणीव जागृती करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्लास्टिक न वापरण्यावरही यावेळी मार्गदर्शन झाले. प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नयेत, त्याचप्रमाणे गटारामध्ये अथवा मोकळ्या जागी प्लास्टिकच्या वस्तू फेकू नयेत याबाबत शिक्षकांनी माहिती दिली. ‘निश्चय केला, नंबर पहिला’ घोषणा देऊन नवी मुंबई महानगरपालिकेला भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान मिळावे याकरिता आपण सर्व नागरिकांनी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी स्वच्छतेविषयक काळजी घेऊन प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी काही स्वच्छताकर्मींनी आपले अनुभव कथन केले. अशाप्रकारे विद्यार्थिनींनी राखी बांधून दाखविलेले भगिनीप्रेम मनाला आनंद आणि समाधान देणारे असल्याची भावना स्वच्छतामित्रांनी व्यक्त केली. राख्या पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेशही या माध्यमातून प्रसारित झाला.
