नवी मुंबई : अनेक नागरिकांना पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची आंतरिक इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अथवा कोणी सोबत नसल्याने तसेच पुरेशी माहिती नसल्याने जाणे शक्य होत नाही. यादृष्टीने मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत भारतातील 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांची सूची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या योजनेची माहिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना मिळावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नमुंमपा मुख्यालयात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या अनुषंगाने योजनेचा लाभ घेण्यासाठी लेखी ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात येत असून महानगरपालिकेची दिघा ते बेलापूर अशी आठही विभाग कार्यालये या ठिकाणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिक संघटना आणि महानगरपालिकेच्या विरंगुळा केंद्रांमध्येही अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. सदर अर्ज विनामूल्य उपलब्ध असून विभागीय क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती व अर्ज पोहोचविण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे वय 60 वर्ष व त्यावरील असावे. त्याचप्रमाणे लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापेक्षा अधिक नसावे अशी पात्रता नमूद करण्यात आलेली आहे.
याकरिता अर्ज करताना त्यासोबत स्वसाक्षांकित आधार कार्ड / रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला / अर्जदाराचे 15 वर्षापूर्वींचे रेशनकार्ड / मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असावे.
तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्न रु.2.50 लक्ष पर्यंत असलेला उत्पन्न दाखला किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY) / प्राधान्य कुटुंब योजना (PHH) / वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लक्षच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले (NPH) शिधापत्रिका धारक यापैकी कोणताही एक कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
याशिवाय शासकीय वैदयकिय अधिकारी यांनी दिलेला शारीरिकदृष्टया निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे अर्जदाराचे मूळ वैदयकीय प्रमाणपत्र सादर करावे.
तसेच शासकीय / वैदयकीय अधिकारी यांनी दिलेले शारीरिकदृष्टया निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे जीवनसाथी / सहाय्यकाचे मूळ वैदयकीय प्रमाणपत्र सादर करावे. या जीवनसाथी / सहाय्यकाचे वय किमान 21 वर्ष ते कमाल 50 वर्ष असावे.
या योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत आणि अपात्रता नसल्याचे अर्जदाराचे हमीपत्रही अर्जासोबत सादर करण्यात यावे.
त्याचप्रमाणे जवळच्या नातेवाईकाचे प्रमाणपत्र आणि 75 वर्षे वय असलेल्या अर्जदाराच्या मदतनीसाचे (जीवनसाथी/सहाय्यक) मूळ वैदयकीय प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे.
याशिवाय अर्जदारासोबत जाणाऱ्या जीवनसाथी/सहाय्यकाचे आधार कार्ड आणि हमीपत्र जमा करणे बंधनकारक आहे.
तरी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेले योजनेचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह भरुन शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००
