कोर्टनाका सर्कलजवळ होणार अश्वरिंगण सोहळा
ठाणे : ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाच्या वतीने यंदाही वारी समतेची आणि वारी मानवतेच्या माध्यमातून यंदाही ठाणेकरांना समतेची वारी अनुभवता येणार आहे. येत्या रविवारी ठाण्यातील कोर्टनाका परिसरात होणाऱ्या या वारीत अश्वरिंगण सोहळा वारकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे.
या वारीचे आयोजक ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रफुल वाघोले म्हणाले काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांना वारी अनुभवता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर या वारीचे आयोजन करण्यात आले. या वारीच्या माध्यमातून समतामुलक् विचारांचा जागर घालण्यात येणार आहे. या वारीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे.
या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप भानुदास मोरे देहूकर यांचे किर्तन होणार आहे.या वारीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वारकरी संप्रदायातील संत, महात्मे यांची वेशभूषा केलेले कलावंत सहभागी होतील. त्यामुळे ठाणेकरांनी या वारीत सहभागी होऊन प्रत्यक्ष वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी केले आहे.
