बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ
अनिल ठाणेकर

ठाणे : बदलापूरच्या शाळेत कोवळ्या चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मन सुन्न करणारा आहे पण हा गुन्हा दडवू पाहणारे शाळेचे संस्थाचालक सोडून पोलिसांनी आंदोलकांवरच लाठीचार्ज केला आणि त्यांनाच तुरुंगात डांबले. या सगळ्या प्रकारांनी व्यथित होऊन महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची दिलेली हाक, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. जनवादी महिला संघटना या निर्णयाचे स्वागत करते. संघटनेच्या सर्व शाखांनी आपल्या जास्तीत जास्त सभासदांना घेऊन रस्त्यावर उतरावे आणि या बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची राज्य कमिटीच्या अध्यक्षा नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केले आहे.
बदलापूरच्या शाळेत कोवळ्या चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मन सुन्न करणारा आहे. अर्थात मन सुन्न करणाऱ्या घटना सध्या तर दिवसागणिक घडत आहेत. काही चव्हाट्यावर येतात. मग माध्यमे, जनता यांनी आरडाओरड केली की थोड्या वेळासाठी आरोपींना अटक करणे, कडक कारवाईचे आश्वासन देणे हा सोपस्कार होतो. अंकिता म्हात्रेवर तर देवाच्या दरबारात त्याची पूजा करणाऱ्यांनीच सामूहिक बलात्कार आणि खून केला. यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर, वसईतील तरुणी एकतर्फी प्रेमाच्या शिकार. दिवसागणिक या घटना वाढतच आहेत.
बदलापुरातील घटनेनंतर जनतेचा उद्रेक होऊन तिने जबरदस्त आंदोलन केले. ते उत्स्फूर्त होते. मात्र संवेदनशीलता मुळातच नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन राजकीय असल्याचा आणि त्यासाठी बाहेरून लोक आणल्याचा साचेबद्ध आरोप केला. अटक झालेले सगळे नागरिक बदलापूर येथीलच असल्याचे सिद्ध झाल्याने या आरोपातील हवा निघाली. महिलांच्या, आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ लाडक्या बहिणींचे देवा भाऊ तर दिल्लीत होते. त्यांना असल्या फालतू घटनांशी काहीही सोयरसूतक नाही आणि का असावे? विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर देवा भाऊंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे युतीतील धुसफूस, उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच, मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्या सवंग योजना आणि त्यासाठी दिल्लीश्वरांची मर्जी राखणे, हे सगळे सोडून ते दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची दखल का घेतील? घेतलीही असती हो, पण शाळा पडली आपलीच, म्हणजे संस्कारी. आणि बलात्कार हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, तो नष्ट होऊ शकत नाही, असे त्यांच्याच पक्षाच्या विदुषी, पडद्यावर सशक्त महिलेच्या भूमिका करणाऱ्या व खासदार असणाऱ्या एका अभिनेत्रीने म्हणूनच ठेवले आहे. पोलिसांबद्दल काय बोलावे? ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, अशी त्यांची स्वच्छ आणि सोपी भूमिका. भाजप-रास्वसंघ चालवत असलेल्या शाळेच्या इमारतीत झालेल्या अत्याचाराची दखल घेऊन गुन्हा दाखल करून घेण्याचा अर्थ काय? इतके न कळण्याइतके पोलीस दूधखुळे नक्कीच नाहीत. मग उरले कोण? पालक आणि सामान्य नागरिक, ज्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची खरी चिंता आहे तेच. आणि आंदोलन करण्यापलीकडे त्यांच्या तरी हातात काय आहे? असा संतापजनक प्रश्न अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य कमिटीच्या अध्यक्षा नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केला आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *