पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) पीअर टीमने भेट दिली व महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, इतर पदाधिकारी, प्राचार्य यांनी या टीमचे स्वागत केले.
नॅक पीआर टीममध्ये भुवनेश्वर (ओडिसा) येथील शिक्षा अनुसंधान विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. शितिकांता मिश्रा, तामिळनाडूमधील मनोमिलियन सुंदरम विद्यापीठाच्या व्यवसाय व व्यवस्थापन विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. राजशेखरन बालसुब्रमण्यम, डॉ. श्रीनगरच्या (जम्मू काश्मीर) इस्लामिया महाविद्यालयाचे प्राचार्य खुर्शिद अहमद खान यांचा समावेश होता. या वेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी गडदे, महाविद्यालयाचे सीडीसी मेंबर प्रभाकर जोशी, पनवेलच्या पिल्ले कॉलेजचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी गजानन वडेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष समन्वयक डॉ. महेश्वरी झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पाच वर्षांचा संपूर्ण अहवाल सादर केला. नॅक पीअर टीमचे डॉ. शितिकांता मिश्रा यांनी महाविद्यालयाचा दर्जा वाढवण्यासाठी बहुमूल्य सूचना दिल्या. त्यासाठी शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले व यशस्वीरित्या अहवाल सादर केला तसेच महाविद्यालयाच्या पुढील विकासाच्या वाटचालीमध्ये संपूर्ण सहयोग देण्याची हमी दिली.डॉ. शितिकांता मिश्रा यांनी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी सांगता सत्रात संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांचे व पदाधिकार्‍यांचे नॅक मूल्यांकनासाठी लागणार्‍या अमूल्य सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *