नंदुरबार : बदलापूरमधील ज्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला ती शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात येतोय. तसेच शाळेने घटनेचे सीसीटिव्ही फुटेज गायब केलेय असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. नाना पटोले यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र हा गुजरात धार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, पोलीस कारवाई करत नाही, आरोपी पकडत नाही म्हणून जनआंदोलन निर्माण झाले. हा राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात सुमारे 22 हजार अत्याचाराच्या घटना घडल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे. बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. म्हणूनच आपला निषेध नोंदविण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
