दृष्टीक्षेप

अजय तिवारी

ध्वनी प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. ध्वनी प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्न. गरज नसताना कवा वाहतुक कोंडीत अडकल्यावर उगाचच हॉर्न वाजवत राहणाऱ्यांची संख्या देशात कमी नाही. हॉर्नचा आवाज कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. वाहनचालकांना दंडही आकारला जातो. मात्र या प्रयत्नांचा आवाका वाढायला हवा.

रस्त्यावरून चालताना कवा वाहनाने प्रवास करताना कर्कश्श हॉर्न कानांवर पडतात. अनेकांना उगाचच हॉर्न वाजवण्याची सवय असते. सिग्नल सुरू होत नाही तोच वाहनचालक हॉर्न वाजवू लागतात. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतरही नाहक हॉॅर्न वाजवला जातो. वाहनांचे हॉर्न वाजू लागल्यावर आपणही अगदी सहज कानांवर हात ठेवतो. आता हॉर्न वाजणं कवा वाजवणं ही वर वर पाहता सर्वसामान्य बाब वाटत असली तरी प्रत्यक्षात त्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. मुळात हॉर्न वाजवण्याविषयी काही नियम आहेत. अकारण हॉर्न वाजवल्यास दंडही आकारला जाऊ शकतो. रुग्णालय, न्यायायलांचा परिसर तसेच अन्य काही परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले जातात. या भागांमध्ये वाहन चालवताना हॉर्न वाजवल्यास वाहनचालकांची खैर नसते. मात्र अकारण हॉर्न वाजवणे हा गुन्हा आहे, याबाबत अनेकांना माहितीच नसते. ‌‘आय ॲम रोड स्मार्ट‌’ या संस्थेने इंग्लंडमध्ये एक हजार वाहनचालकांच्या केलेल्या सर्वेक्षणात चारपैकी एक वाहनचालक पुढचे वाहन खूप हळू चालत असेल तर हॉर्न वाजवतो, असे लक्षात आले. तसेच शिकाऊ कवा नवा चालक गाडी चालवत असल्यास आपण हॉर्न वाजवत असल्याचे सुमारे 20 टक्के वाहनचालकांनी कबुल केले. सीटबेल्ट न बांधणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे याबाबत चालताना माहिती असते. मात्र चुकीच्या पद्धतीने कवा विचित्र आवाज करत हॉर्न वाजवल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो हे अनेकांच्या गावीही नसते. हॉर्न वाजवण्याच्या नियमांबाबत बरीच अनास्था पहायला मिळते. तसेच याबाबत फारशी जागरूकता नसल्याचेही चित्र आहे.
जगातील बहुतेक महामार्ग संहितांनुसार कार सुरू असताना रस्त्यावरील इतर वाहनांना आपणही रस्त्यावर आहोत याची जाणीव करून देण्याची खरोखर गरज असते त्यावेळीच हॉर्न वाजवावा, असा नियम आहे. मोटरचालकांनी आपल्या गाडीचा हॉर्न आक्रमक पध्दतीने अजिबात वाजवू नये, असाही नियम आहे. कोणत्याही योग्य आणि व्यवहार्य हेतूखेरीज इतरांना सावध करण्याचे साधन म्हणून हॉर्नचा वापर केला जाऊ नये, असेही बहुतांश नियम सांगतात. मात्र हॉर्न हा वाजवण्यासाठीच तयार करण्यात आला आहे, असा समज करून घेऊन वाहनचालक बिनदिक्कतपणे वाजवत असतात आणि हे फक्त भारतातच घडते असे नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती आहे. आपल्याप्रमाणेच पार्किंग हा ब्रिटनमधीलही महत्त्वाचा मुद्दा आहे. एका वर्षातला सुमारे चार दिवसांचा कालावधी ब्रिटिशचालक पार्किंगची जागा शोधण्यात घालवतात आणि पार्किंगमध्ये गाडी लावताना हॉर्नचा अकारण मोठ्या प्रमाणात उपयोग करतात तर अमेरिकेत चालक कुठल्या भागात गाडी चालवत आहे, त्यावर हॉर्नचा किती आणि कसा उपयोग करावा ते ठरवले जाते. न्यूयॉर्कसारख्या उत्तरेकडच्या भागात सदासर्वकाळ हॉर्न वाजवला जातो, मात्र दक्षिणेकडच्या भागात क्वचितच हॉर्न वाजवला जातो. या सगळ्या नियमांमध्ये त्यांची अंमलबजावणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. युरोपियन देश आणि अमेरिका वगळता बहुतेक देशांमध्ये ही अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नाही.
भारतातही याविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात आहे. विविध राज्यांचे वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलीस ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्नशींल असून यासाठी काही उपक्रमही राबवले जातात. मुंबई पोलिसांनी 14 जून हा ‌‘नो हाँकग‌’ म्हणजेच हॉर्न न वाजवण्याचा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले होते. लोकांमध्ये हॉर्नच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात आले होते. अन्य महानगरांमधले पोलीसही अशाच पद्धतीने हॉर्नविषयक जागरूकता अभियान राबवत असतात. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018 मध्ये जारी केलेल्या एका अहवालानुसार भारतातल्या सहा महानगरांमधल्या आवाजाची पातळी 80 डेसिबल्सपेक्षा अधिक होती. राष्ट्रीय अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‌‘नीरी‌’ने महाराष्ट्रातल्या 27 शहरांमधल्या सर्वेक्षणानंतर वाढत्या ध्वनी प्रदूषणासाठी वाहतुकीला जबाबदार धरले होते. वाहतुकीमुळे उत्पन्न होणाऱ्या आवाजात सर्वात मोठा वाटा या हॉर्नचा असल्याचेही यातून समोर आले होते.
वायू प्रदूषणापेक्षाही ध्वनी प्रदूषण अधिक घातक असल्याचे राष्ट्र्रीय आवाज परिषद आणि फ्रान्सच्या इकोलॉजिकल ट्रान्सिशन एजन्सीने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. कोरोनाची साथ पसरण्याआधी ध्वनी प्रदूषण हे मानवी आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असल्याची बाब समोर आली होती. दाट लोकवस्तीच्या भारतातल्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण मानवी आरोग्यास हानीकारक ठरत असल्याची बाबही समोर आली आहे. मानवी कानांना 26 डेसीबलचे ध्वनी आरामदायक वाटतात. 70 हून अधिक क्षमतेचे ध्वनी आरोग्यासाठी अपायकारक असतात. त्यांच्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, अस्वस्थता, तणाव आणि निद्रानाश यासारखे अपाय होतात. ध्वनिप्रदूषणाला नियमितपणे तोंड द्यावे लागले तर उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि तात्पुरता कवा कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. एकाग्रता नष्ट होण्याचा दुष्परिणामही दिसून येतो. ट्रक, बस यासारख्या मोठ्या चारचाकी गाड्यांमुळे सुमारे 120 डेसीबल तीव्रतेचा आवाज निर्माण होतो आणि 85 डेसीबलहून अधिक तीव्रतेचा आवाज मानवी आरोग्यासाठी अधिक अपायकारक असतो. दीर्घकाळ हॉर्न वाजवत राहिल्यास ऐकणाऱ्याच्या मनात तणाव निर्माण होतो. वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांची मर्यादित रुंदी यामुळे जगभरातील अनेक शहरांमध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. अशा वेळी हॉर्न वाजवल्यामुळे अपघात तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होते असे दिसून आले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र वाहतूक विभागाने प्रचारातील ‌‘हॉर्न ओके प्लीज‌’ या वाक्यावरही बंदी घालणारे सर्क्युलर काढले होते. राज्यातील अनेक वाहनांच्या मागच्या बाजूला असे लिहिल्याचे आढळते. मात्र अशा प्रकारचे वाक्य लिहिणे हा महाराष्ट्र मोटर व्हेईकल रुल्सच्या 134 (1) कलमाचा भंग आहे. त्यामुळे ट्रक कवा टेम्पोच्या बाजूने जाताना लोकांना दर वेळी हॉर्न वाजवावा लागतो. या वाक्यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो असेही या सर्क्युलरमध्ये म्हटले गेले होते. देशभरच वाहनांच्या मागे ‌‘हॉर्न ओके प्लीज‌’ कवा ‌‘ब्लो हॉर्न‌’ असे संदेश रंगवल्याचे आढळून येते. विशेषतः ट्रकच्या आणि लॉरींच्या मागे असे लिहिल्याचे सर्रास आढळते. मागून पुढे जाणाऱ्या वाहनांनी हॉर्न वाजवणे त्यामुळे बंधनकारक बनते. मुंबईसारख्या ठिकाणी तर दीर्घ काळ वाजवले जाणारे हॉर्न ही नियमित बाब बनली आहे. वाहतुकीची कोंडी झाली की चारही बाजूंनी असे हॉर्न वाजू लागतात आणि आधीच त्रस्त असलेल्या विविध वाहनचालकांच्या मानसिक त्रस्ततेत आणखी भर पडते. खरे तर समोर कोंडी झालेली आहे हे माहिती असतानाही हॉर्न वाजवत राहणे हा गुन्हा आहे. त्यामुळे यावर कारवाई होऊ शकते ही बाब लोकांपर्यंत पोहोचवली जाण्याची नितांत आवश्यकता आहे.
एका अंदाजानुसार दीड कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या एकट्या मुंबईतच सर्वसाधारणपणे 9 लाख कार, 10 हजार बस आणि वीस लाख दुचाकी रोज रस्त्यांवर धावत असतात. एवढ्या प्रचंड प्रमाणात धावणाऱ्या गाड्यांचे वाजवले जाणारे हॉर्न हे ध्वनी प्रदूषणात खूप मोठी भर घालतात आणि लोकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करतात. ध्वनी प्रदूषणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‌‘आवाज फाऊंडेशन‌’सारख्या काही संस्थांच्या मते या त्रासामुळे काही लोकांना प्रसंगी अतिदक्षता विभागातही हलवावे लागते. मुंंबईत सातत्याने 85 डेसीबलहून अधिक तीव्रतेच्या आवाजात हॉर्न वाजवले जातात. एवढ्या आवाजामुळे हृदयविकार, बहिरेपणा आणि उच्च रक्तदाबाचे विकार जडत असल्यामुळे मुंबईत अनेकजणांना या आजारांवरच्या उपचारांसाठी भरमसाठ खर्च करावा लागत आहे. शांततामय जीवनासाठीचा हा संघर्ष दिल्ली, बंगळुरू, चेन्नईसारख्या प्रत्येक महानगरात आणि त्याहून लहान शहरांमध्येही सातत्याने दिसून येत आहे. त्यावर वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि त्याहूनही अधिक प्रमाणात जनजागृती हेच अधिक प्रभावी उपाय असल्याबाबत जगभरच्या तज्ज्ञांचे एकमत आहे. नियमांच्या अंमलबजावणीसह प्रत्येक नागरिकानेही ध्वनी प्रदूषणाचे धोके ओळखून हॉर्न न वाजवण्याचा संकल्प करायला हवा. अन्यथा, परिस्थिती अधिक बिकट होण्यास वेळ लागणार नाही.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *