
काहीतरी नवीन…
श्याम तारे
आपल्या जीवनात आपल्याला काम कसे मिळेल आणि कोणते मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. कोणते या प्रश्नाचे काही प्रमाणात उत्तर आपल्या शिक्षणावर अथवा कौशल्यावर आधारित असले तरी त्यातही आपण नशीबाचा भाग आहे असे काहे वेळी नाईलाजाने म्हणतोच. नशीब नशीब म्हणजे तरी काय असे विचारले तर त्याचे एक उत्तर कधीच नसते. पण ही झाली आपल्यासारख्या साध्या माणसांची कथा…
इसवी सन १९७० च्या सुमाराला मेंदू वैज्ञानिक जेम्स ऑस्टिन यांनी असा विचार मांडला की आपण आपले नशीब चार प्रकारांनी पुन्हा घडवू शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर ही आवश्यक बाब ठरली असल्याने जेम्स ऑस्टिन यांनी सांगितलेले चार प्रकार आणि त्यांचा आपल्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो हे आपण बघणार आहोत.
आपल्या जीवनात संगणक आले त्या काळात त्यावर खेळले जाणारे खेळ देखील अवतरले. त्यापैकी एका खेळात आपले व्यक्तिमत्व आणि स्वभाव दिलेल्या सात पैकी कसे असावे हे आपणच ठरवावे लागायचे. यात शक्ती, आकलन, सहनशक्ती, आध्यात्मिक तेज, बुद्धिमत्ता, चपळता या सहा सोबतच नशीब देखील होते. नशिबाची टक्केवारी तुम्हीच ठरवायची. हे करताना असे वाटायचे नशीब नेमके असते तरी काय? ते जन्मत: असते की घडवले जाऊ शकते? एका विचारानुसार नशीब म्हणजे विश्वाच्या पसाऱ्यातील कारण आणि परिणाम असतो असेही वाचले होते.
जेम्स ऑस्टिन म्हणतात की नशीबावर मानसिक आकलन आणि परिस्थितीनुसार घटक यांचा प्रभाव असतो. त्यांच्या मते नशीब हे काही प्रमाणात काही ईश्वरीय देणगीच्या परंतु अनपेक्षितपणे समोर येऊ शकते. मात्र बहुतेक प्रकारचे नशीब मनाचा मोकळेपणा आणि जगातील प्रत्येक नव्या अनुभवामधून जाण्याची तयारी यामधून दिसते. अनपेक्षितपणे घडणाऱ्या गोष्टी तर घडत असतातच त्यांच्यासाठी तयार असणे गरजेचे असते.
नशीबाच्या चार प्रकारांपैकी पहिला असतो तो अर्थातच आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या विश्वाच्या निर्णयाचा. याला आपण आंधळे नशीब असेही म्हणू शकतो. आपल्या जीवनात हे कधीही आणि कुठेही घडू शकते. काही खास कामासाठी तयार होऊन जात असताना आणि रस्त्याच्या बाजूने चालत असतानाही एखादे वाहन नेमके रस्त्यावरच्या खड्ड्यातील पाण्यावऋण जाते आणि तुमचे खराब झालेले कपडे आणि कदाचित चुकलेली महत्वाची मुलाखत हेच नशीब असू शकेल. परवाच्या बातमीवरून दिसेल की ३६ तास सातत्याने काम करीत राहणारे डॉक्टर आणि त्यांचे नशीब असे की आराम करायला जागाही नाही.
दुसरा प्रकार थोडासा वेगळा आहे. यात तुम्ही संस्धी मिळण्याची आतुरतेने वाट बघत असता. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न देखील आपल्या परीने करीत असता. त्यात यश येते आणि एका जागी तुम्हाला नोकरीची संधी दिली जाते. नोकरी सुरु केल्यानंतर काही काळातच तुम्हाला कुणीतरी एकअ नव्या उपक्रमाची माहिती देतो आणि अट म्हणून त्यासाठी काही प्रशिक्षण घ्यावे लागणार असते. का कुणास ठाऊक पण तुम्ही यासाठी होकार देता आणि सुरु असलेल्या नोकरीला पाठ दाखवता. असे का याचे उत्तर कुणीच देत नाही. चांगले झाले तर चेहरा आनंदी असतो आणि चुकले असेल तर ‘आंबट’ झालेला असतो. हेही नशीबच…
तिसऱ्या प्रकारात तुम्ही आपल्याला हव्या असलेल्या संधीकडे पूर्ण लक्ष ठेवून असता आणि त्यासाठी आवश्यक तयारीही करून ठेवता. तुमच्या कंपनीत कृत्रिम बुद्धिमत्ता येणार आहे अशी माहिती मिळते आणि या नव्या विषयात तुम्ही तयारे करू लागता. जेव्हा ही बाब समोर येते तेव्हा तुम्ही त्यासाठी सुयोग्य असल्याचे कंपनीच्या लक्षात येते आणि इतरांच्या अगोदर तुम्हाला ही जागा मिळते. या ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवून आणि मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून केलेली तयारे उपयोगात आली असते. यामध्ये तुम्ही दाखवलेली जागरूकता तुमच्यासाठी नशीब बनून आलेली असते हे लक्षात घ्या.
नशीबाचा चौथा प्रकार असतो तो म्हणजे तुमच्यामध्ये असलेले काही वैशिष्ट्यपूर्ण गुण, अनुभव किंवा खास विषयातील पैलू ज्यामुळे तुम्हाला काही विशिष्ट संधी मिळू शकते. कंपनीला परदेशात काम सुरु करायचे आहे आणि तुम्हाला त्या देशाची भाषा कळते किंवा तेथे तुम्ही आपल्या क्षेत्रातील काही लोकांना ओळखत असाल तर तुमच्याशिवाय योग्य माणूस मिळणार कसा? आणि मग साहजिकच नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूनेच असेल.
डोळे उघडे ठेवा, आपल्या खास विषयात समोर राहण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सक्रिय रहा… नशीबाची ही तीन सूत्रे लक्षात ठेवा…
प्रसन्न फीचर्स
