मुंबई: राज्याच्या विविध भागात महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अंधेरी (पश्चिम) येथील भाजपचे आमदार अमीत साटम यांनी झोन-९ चे पोलीस उपायुक्त राज टिळक रौशन यांना पत्र लिहून बीएमसी, शासन अनुदानित, ICSE आणि CBSE सह खाजगी शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या कॅम्पसमध्ये पुरेसे CCTV बसविल्याबाबत खातरजमा करावी. तसेच त्यांच्या अनुपालनाची खातरजमा करण्यासाठी शैक्षनिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशीही मागणी आमदार साटम यांनी केली आहे.
शुक्रवारी पोलीस उपायुक्तांना लिहिलेल्या पत्रात साटम यांनी अलीकडील काही घटनांमुळे निर्माण झालेल्या भीती आणि दहशतीमुळे दक्षता आणि गस्त वाढवण्याचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित असले पाहिजेत आणि रिअल-टाइम डेटा उपलब्ध झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर साटम यांनी हे पत्र पोलिसांना लिहिले आहे.
पोलिसांनी सर्व बीएमसी शाळा, राज्य सरकार-अनुदानित शाळा, सर्व ICSE, CBSE सह खाजगी तसेच आंतरराष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कार्यान्वित असणे गरजेचे आहे. तसेच, सर्व शैक्षणिक संस्थांना भेट देण्यासाठी एका पोलीस अधिकारी नियुक्त केली पाहिजे. त्यामुळे सीसीटिव्ही बाबत पालन केले जात आहे का याची खात्री करता येईल, असे साटम म्हणाले.
आमदार साटम यांनी पोलिसांना रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या, अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्या सर्व समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. पोलिसांनी सर्व सोशल मीडिया हँडल आणि प्लॅटफॉर्मवरही देखरेख आणि पडताळणी करणे आवश्यक आहे. रीअल टाइम डेटा, पुरावे किंवा साक्षीदारांशिवाय विविध घटना पोस्ट करतात. यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण होते, असे साटम यांनी सांगितले.
साटम यांनी रस्त्यावर पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्याचे आवाहन केले. पोलिस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख होण्याबाबत आणि कोणत्याही नोंदवलेल्या घटनांना तत्काळ प्रतिसाद करण्यावर भर पाहिजे, असेही साटम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *