मुंबई : भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. त्यामुळेच देश-विदेशातील श्रीगणेशोत्सवाची सजावट करताना कटाक्षाने प्लास्टर ऑफ पॅरिस अथवा थर्माकोलचा वापर टाळला जात असून त्याला पर्याय म्हणून पुठ्ठ्याच्या कागदापासून मखर तसेच पर्यावरण पूरक सजावटींवर भर दिला जात आहे.
अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येणे शक्य आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पण लोकांचाही आग्रह महत्वाचा आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेचे जनक `उत्सवी’ संस्थेचे प्रमुख नानासाहेब शेंडकर यांनी २००१ साली त्याचा पहिल्यांदा अवलंब केला. त्यांनी स्वतःचा थर्मोकोल निर्मितीचा सुस्थितीतील कारखाना बंद करून कागदी पुठ्ठ्यांपासून मखर तसेच सजावटी सुरु करण्याचा श्रीगणेशा केला. त्यांची ही २४ वर्षांची चळवळ आज प्रत्यक्षात साकारली जात आहे. यापूर्वी छोट्या आकाराच्या मखरी घरगुती सजावटीसाठी वापरल्या जात असत. पण त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देखील मोठ्या आकाराच्या, सहजरित्या हाताळता येतील आणि दीर्घकाळ टिकतील, अशा सजावटींच्या मखरी तयार करण्यावर भर दिला. त्यामुळेच त्यांची मागणी देश-विदेशात होऊ लागली. यंदा महाराष्ट्र मंडळ, लंडन यांनी त्यांच्या अयोध्या येथील राममंदिराची प्रतिकृती त्यांच्याकडून बनवून घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही कला देश-विदेशात पोहचली आहे. आज स्वतःपासून त्यांनी केलेली सुरूवात देश व जगभरातील गणेश भक्तांपर्यंत पोहचण्याचे कारण श्रीगणेशावरील श्रद्धा आणि त्यायोगे पर्यावरणाचे संवर्धनाचे उदेद्शय साध्य झाले आहे. या कार्याचा श्रीगणेशा करून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत बोलताना नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी असली तरी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे,  कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचे महत्व आजच्या बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे. हा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करण्याचा आग्रह धरुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *