अशोक गायकवाड
रायगड : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा पशुधन हा महत्वाचा घटक आहे. पशुपालनाकडे केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून न पाहता एक चांगला व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
नियोजन भवन येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम, उपायुक्त रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.अजित हिरवे यासह कार्यशाळेस जिल्हाभरातील पशुपालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, स्वाभाविकपणे दुग्ध उत्पादन, अंडी, कुक्कुटपालन, शेळी पालन या व्यवसायाला आपल्या जिल्ह्यात खुप वाव आहे. पशुसंवर्धनाला चालना दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य निर्मिती इ. अशा अनेक क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे पशुसंवर्धनातून आपण उद्योजकता विकास घडवून लहान लहान उद्योजक घडवू शकतो. त्यातून अनेकांना रोजगाराची संधीही आपण देऊ शकतो. महिला बचतगटानी कुक्कुट पालन व्यवसायात पुढाकार घ्यावा असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. तसेच या वर्षात किमान पाच पोल्ट्री तयार करण्याचे निदेश संबंधित यंत्रणेला दिले. दुग्ध व्यवसाय आणि पूरक जोड धंदेवाढीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा किमान ५ वैरण प्रकल्प तयार करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय पशुधन योजनेचा शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी अंगिकार करावा. त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी, कोंबडी, शेळी पालन यासाठी जिल्ह्यात चांगल्या संधी आहे. तसेच शासनामार्फत मोठया प्रमाणावर अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे सांगितले. उपायुक्त डॉ.देशपांडे यांनी लवकरच सुरु होणाऱ्या पशु गणनेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी अचूक व बिनचूक माहिती द्यावी असे सांगितले. तसेच शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन अशा अनेक व्यवसायाकरीता शासनाव्दारे देण्यात येणाऱ्या अनुदान आणि अनुषंगिक माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम यांनी आभार मानले. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत वैरणविकास व गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक सायलेज उत्पादन, शेळीपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन, बॅंक अर्थसहाय्य इ. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
00000
