रमेश औताडे
मुंबई : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी राज्यभरातून सुमारे चार हजार वीज कंत्राटी कामगारांनी मोर्चा काढला. सरकारने जर आता गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला.
ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा. सरकारने संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जो पर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तो पर्यंत कामगार आंदोलनातून घरी जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. कंत्राटी कामगार व कायम कामगार यांच्या कामात काही फरक नाही. मात्र वेतनात फरक का ? कंत्राटी कामगार कायम करा म्हणून न्यायालय वारंवार आदेश देत असते तरीही सरकार अंमलबजावणी करत नाही त्यामुळे यापुढचे आंदोलन बेमुदत असेल असे सचिन मेंगाळे यांनी सांगितले.