प्रेरणा, सेजल, रोशनची निवड
मुंबई : येत्या २८ ऑगस्टपासून माल्टा येथे सुरु होणाऱ्या विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रेरणा साळवी, सेजल मकवाना, रोशन गावकर या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. रोशन १०५, प्रेरणा ७६ व सेजल ६३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोशन ने रौप्य पदक पटकावले होते. कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रेरणा ला कांस्य पदक मिळाले. याच स्पर्धेत सेजलने ११२.५ किलो वजन उचलून बेंचप्रेसमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम साजरा केला. रोशन १४ वीत तर प्रेरणा १५ वीत शिकत आहेत. सेजल बीपीएड करत आहे. रोशन, प्रेरणा हे दोघे चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पूर्व) येथील “युनायटेड क्लब”चे खेळाडू आहेत. रोशन, प्रेरणाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चाळके प्रशिक्षक आहेत. सेजल जोगेश्वरी (पूर्व) येथील “टू पॉवर जिम” मध्ये सराव करते. संकेत चव्हाण यांचे मार्गदर्शन सेजलला मिळत आहे. संजय सरदेसाई, सतीश पाताडे, सुरेश गद्रे यांनी विश्व स्पर्धेसाठी प्रेरणा, सेजल आणि रोशन या तिघांना शुभेच्छा दिल्या आहेत.