अवघ्या ८ महिन्यात तीन लाख पर्यटकांनी दिली भेट…!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सलाम…!

राजन आनंद चव्हाण

सिंधुदुर्ग: ‘ होय ‘ ‘ जेव्हा लोक प्रवास करतात,तेव्हा त्यांचं आयुष्य बदलतं असं म्हणतात…! ‘ १,मे,११९७ रोजी जेव्हा सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तेव्हा आम्हालाही असच वाटत होतं.देश – विदेशातले पर्यटक  इथं येतील,इथले स्वच्छ – सुंदर समुद्र किनारे बघतील,निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद उपभोगतील,इथल्या ऐतिहासिक गड- किल्ल्यांचा,इथल्या संस्कृतीचा – कलेचा अभ्यास करतील,इथल्या कोकणी मेव्याचा,मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतील जेणेकरून आमचंही जीवनमान सुधारेल.मात्र गेल्या २७ वर्षात म्हणावा तसा बदल,म्हणावी तशी परिस्थिती बदललेली दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन(१, मे १९८१)जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सुमारे २५ ते ३० हजाराच्या आसपास होतं.

कोणत्याही भागाचा,प्रांताचा,देशाचा,  विकास हा तिथल्या पायाभूत सुविधा,दळणवळणाची साधनं,उपलब्ध साधनं- संपत्ती, यावर खरं तर अवलंबून असतो.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कै.जॉन केनेडी यांचं एक वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवं.’अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत असं नाही,तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’.

सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचे सर्व श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले आणि त्यांचे खास विश्वासू सहकारी, तत्कालीन राज्यमंत्री एस.एन.देसाई यांनाच जातं. कुडाळ- वेंगुर्ल्याचे आमदार असताना त्यांनी कुडाळ शहराजवळ ‘ एमआयडीसी ‘च्या माध्यमातून अनेक लहान मोठे उद्योग आणले.तरुण – तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.मात्र काही वर्षातच या उद्योगांना घरघर लागली.त्यात राजकीय हेव्यादाव्यामुळे   निसर्गरम्य सिंधुदुर्गात मोठे – मध्यम उद्योग नको.लघु उद्योग ,कुटिरोद्योग हवेत अशा आग्रहातून आहे त्या उद्योगांकडे ,त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि हळू हळू एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत गेले.बघता बघता या उद्योगनगरीला अवकळा आली.या एम आय डी सी तून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता हे आताच्या तरुण तरुणींना सांगीतलं तर खरंच वाटणार नाही.कारखाने बंद पडले आणि कुडाळ शहर आणि आसपासच्या परिसराची रयाच गेली.एकेकाळी गजबजलेलं असणार असं हे कुडाळ एकदम शांत झालं. इथली धावपळ थांबली. कुडाळ शहराच्या आठवणी सांगताना इथल्या जुन्या जाणत्या व्यापाऱ्यांचा, बुजुर्ग मडळींचा कंठ दाटून येतो. ‘गेले ते दिन गेले ‘ हेच उद्गार त्यांच्या तोंडून निघतात.

ही ‘एमआयडीसी’ पुनरुज्जीवीत  व्हावी यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. मधल्या काळात काही उद्योग आले आणि काही कालावधीत बंदही पडले. आजही     ‘अतिरिक्त एमआयडीसी’त उद्योग येताहेत, यापुढेही ते येतील, तरुणांना कायमचा रोजगार मिळेल याच आशेवर इथले तरुण -तरुणी आहेत.

पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर या जिल्ह्याचं रुपडंच पालटून जाईल असं आम्हाला वाटलं होतं पण याही बाबतीत निराशाच झाली.याला कारणीभूत आमची मानसिकता, आमचा करंटेपणा. आम्हाला ‘Sea World’ नको, मालवणच्या खोल समुद्रातल्या ‘ ‘Marine sanctuary’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन प्रकल्पांना आमचा विरोध. परदेशी पर्यटक जे कपडे घालतात त्यानं आमची संस्कृती बिघडते…! मात्र  ओरड करणारी हीच मंडळी मात्र सिंगापूर, मलेशिया, थायलंड किंवा अन्य देशांमध्ये भटकंती करून येतात, तेव्हा मात्र आमची संस्कृती बिघडत नाही. हा दांभिकपणा जोपर्यंत आम्ही सोडत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यटन विकास कधीच होणार नाही.

आमचे समुद्र किनारे गोव्यापेक्षा स्वच्छ आणि सुंदर आहेत अशी शेखी आम्ही मिरवतो पण त्या समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना आपण कोणत्या सोयी – सुविधा निर्माण केल्या हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. काही ठिकाणी तर चहा -कॉफी सोडाच साधी पाण्याची बाटलीही मिळत नाही ही शोकांतिका आहे.

आज गोव्यात दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख पर्यटक येतात.त्यापैकी सुमारे ८-१० लाख विदेशी पर्यटक असतात. युरोप,रशिया इथून पर्यटन हंगामात अनेक चार्टर्ड विमानं येतात. केरळ राज्य, दक्षिणेकडची अन्य राज्ये आज पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करू लागली आहेत. गोव्याच्या बरोबरीनं केरळनंही पर्यटन क्षेत्रात आघाडी घेतली आहे.

आज गोव्यात खाण उद्योग,अन्य उद्योग,फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत.मात्र गोव्याचं अर्थकारण हे पर्यटनावर अवलंबून आहे. एक पर्यटक जेव्हा येतो तेव्हा ११ते १२ जणांना प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोव्यातल्या लोकांनी ‘पर्यटन हीच आपली रोजी-रोटी’ समजून ते केव्हाच स्वीकारलं आहे व पर्यटन विकासाचा ध्यास घेतला आहे. दरवर्षी हॉटेल्स वाढताहेत, दळण- वळणाची साधनं वाढताहेत.आज गोव्याचं दरडोई उत्पन्न सव्वा चार लाख आहे. त्याखालोखाल सिक्कीम आणि नवी दिल्लीचा नंबर लागतो जो सिंधुदुर्गच्या कितीतरी पटीनं अधिक आहे याचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार केला पाहिजे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली तेव्हा मी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटलो होतो. तेव्हा ते म्हणाले होते या विमानतळाचा सर्वाधिक फायदा उत्तर गोवा आणि खास करून सिंधुदुर्गला होईल. तो कसा करून घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे..!’ आज पर्रीकर हयात नाहीत परंतु आम्हाला अद्यापही जाग येत नाही हे आमचे दुर्दैव आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही हेच सांगत आहेत.पण मनावर कोणी घ्यायचं..?

आम्ही मात्र अजूनही पर्यटन महोत्सव, खाद्य महोत्सव, पर्यटन विषयक चर्चासत्र, कार्यशाळा यातच अडकलो आहोत. गेली अनेक वर्ष आम्ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे आराखडेच तयार करतो आहोत, पर्यटन धोरणं जाहीर करतो आहोत.सिंधुदुर्ग किल्ला,देवबाग – तारकर्ली,शिरोडा,रेडी आदी ठिकाणी भेट देणारे सुमारे तीन – साडेतीन लाख पर्यटक यातच आम्ही समाधान मानतो.

राज्याचं पर्यटन महामंडळ तर जिल्ह्यात कुचकामी ठरलं आहे.’मिडास’ नावाचा एक  राजा फार पूर्वी होऊन गेला. तो ज्या वस्तूला हात लावायचा त्या वस्तूचं सोनं व्हायचं. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या एकूण कारभाराचा आढावा घेतला तर महामंडळानं जे जे प्रकल्प सुरू केले त्याची माती झाल्याचं दिसेल. म्हणूनच यापुढं सरकारवर अवलंबून न रहाता, पर्यटन महामंडळ काही करेल याची वाट न पाहता खाजगी क्षेत्रातून विवध प्रकारचे प्रकल्प कसे उभे राहतील यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी त्याचा श्रीगणेशा केला आहे.

पालकमत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’

सावंतवाडी – बेळगाव मार्गावरून एक – दीड कि.मी.अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं ‘केसरी – फणसवडे’ गाव. या गावात पूर्वी केरळी लोक मोठ्या प्रमाणावर ‘व्हॅनिला लागवड’ करत असत, तेव्हापासून हे गाव सर्वांना परिचित.

याच गावात, निसर्गाच्या कुशीत तब्बल ७ एकर क्षेत्रात पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी खाजगी क्षेत्रात ‘केएसआर ग्लोबल ॲक्वेरियम’ उभं केलं आहे. विशेष म्हणजे भारतातलं हे पहिलं – वहिलं ‘फिश थीम पार्क’ उभारण्याचा मान.  यानिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे हे विशेष होय.

या ठिकाणी तुम्हाला’ डिस्कस ‘, ‘स्टिंग्रे ‘,’स्टार फिश’, ‘ पिरान्हा’, ‘क्लाऊन फिश’, ‘फ्लावर हॉर्न’, ‘स्टार फीश’, ‘लायन फीश’,’ टायगर शार्क ‘,’ ऑस्कर’,’ क्रे फिश ‘, ‘पॅरट फीश’,’ अनिमो ‘ यासारखे जगाच्या कानाकोपऱ्यातील मासे एकाच वास्तूत बघायला मिळतील. यासोबतच ‘बर्ड आयव्हरी’ मध्ये ‘ ईमू ‘, ‘ ब्रह्मा कोंबडी ‘, ‘गीज ‘सारखे ‘पोल्ट्री बर्ड्स ‘ आणि ‘, पॅरट्स ‘, ‘ लॉरी ‘,’ सन कोनर ‘ सारखे ‘ एक्झॉटीक’  पक्षी देखील इथं बघायला मिळतील.’गुआना’

‘ गेको ‘, ‘ चॅमीलीऑन ‘असे जगभरातले सरपटणारे प्राणी तसच ‘पुंगनूर गाई ‘ देखील पाहता येतील.

या ॲक्वेरियममध्ये प्रत्येक माशाच्या नैसर्गिक अधिवासानुसार टँकमध्ये विविध प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले आहे हे विशेष हो. तसच प्रत्येक प्राणी-पक्ष्याच्या पिंजऱ्याबाहेर त्यांच्याविषयी माहितीचा फलक लावण्यात आला आहे. या फलकांवरून आपल्याला निसर्गातील विविध सजीवांविषयी विस्तृत माहिती मिळते.

यासोबतच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी १५ फुटी ‘आर्टिफिशियल वॉटर फॉल ‘, ‘ रिव्हर क्रॉसिंग ब्रीज ‘,’ रिव्हर वॉक ‘, ‘ फिशिंग झोन ‘, तसच ‘ फिश फीडिंग पाँड ‘, ‘ ‘ गो-कार्टिंग झोन ‘, ‘कीडस प्ले गार्डन ‘,   ‘बटरफ्लाय गार्डन ‘, शोभिवंत माशांचे उत्पादन युनिट, ‘पॉली हाऊसेस ‘ देखील येथे उभारण्यात आल्या आहेत.

इथलं स्वच्छ,सुंदर मोठं ‘वॉश रूम’, इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेलं ‘केएसआर कॅफे’, त्यात मिळणारे  पदार्थ, रत्नागिरीचे धुरी चालवीत असलेलं ‘स्वाद केसरी रेस्टॉरंट’ त्यातल्या ‘ व्हेज ‘,’ नॉन – व्हेज’ थाळीमुळं इथं येणाऱ्या पर्यटकांचं समाधान करून जातं.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ‘ टनेल ॲकवेरियम ‘, ‘ स्कुबा डायव्हिंग ‘ सुविधेसह तयार होत असून त्या पुढील टप्प्यात ‘बोटींग ‘,   ‘ हाॅट एअर बलून ‘,’ पॅरा ग्लायडिंग ‘, ‘ जंगल सफारी ‘,’ जंगल टुरिझम’, प्रशस्त’ रिसाॅर्ट ‘, ‘वॉटर अँन्ड लाईट शो ‘, ‘झीप लाईन ‘,सायकलिंग ,’ वॉल क्लाइंबिंग,’ फिश

अँगलिंग,’ डॅशिंग कार ‘, ‘स्नो हाऊस ‘ व मत्स्य पालन प्रशिक्षण केंद्र’ ,’ मिनी ट्रेन ‘ या प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्यात येईल व अशाप्रकारे  एक परिपूर्ण ‘पर्यटन संकूल ‘ विकसित करण्यात येईल.

प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यापासून  ते आजपर्यंत अवघ्या ८ महिन्यात सुमारे तीन लाख पर्यटकानी याला भेट दिली. गोवा आणि सिंधुदुर्गातील शाळांच्या अनेक सहली या ठिकाणी भेट देऊन गेल्या. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या १५ किं.मी.वर आहे.गोव्यातल्या पर्यटकांना जिल्ह्यात खेचून आणायचं असेल तर खाजगी क्षेत्रात, पर्यटकांना आकर्षित करणारे विविधांगी प्रकल्प जिल्ह्यात ठिकठिकाणी उभे राहिले पाहिजेत.आता ‘पर्यटन महामंडळ’,’सरकार’ काही करेल याची वाट पाहायची नाही.पालकमंत्र्यांनी सुरुवात करून दिली आहे.आता थांबायचं नाही.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्यटन प्रकल्पांच्या बाबतीत  राष्ट्रीयकृत बँकांची भूमिका उदासीन दिसते आहे.या व अन्य खाजगी बँकांच्या जिल्ह्यात सुमारे ७०- ७५ शाखा आहेत.बँक ऑफ इंडीया ही जिल्ह्याची ‘लीड ‘ बँक आहे.पर्यटन विकासात या बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते मात्र आजपर्यंत बँकेनं ती नीटपणे बजावली की नाही हे तपासून पहाण्याची गरज आहे.या बँका जिल्ह्यातून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करतात मात्र जिल्ह्यात प्रत्यक्षात किती कर्ज वाटप करतात,विशेषतः पर्यटनासाठी किती कर्ज देतात हा संशोधनाचा विषय आहे.गोव्यात या उलट परिस्थिती आहे.तेव्हा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या झोनल अधिकाऱ्यांची लवकरात लवकर बैठक घ्यावी म्हणजे सारं चित्र स्पष्ट होईल.आणि मग केंद्रीय स्तरावर हा प्रश्न हाताळावा लागेल.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई – पुणे व लगतच्या गोवा राज्यात अनेक टूर कंपन्यांची कार्यालये आहेत.त्यांच्या प्रतिनिधींना दोन-तीन दिवस’सिंधुदुर्ग दर्शन ‘ घडवलं,त्यांच्यासमोर ‘ प्रेझेंटेशन ‘ दिलं ‘तर पुढे अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *