कृष्णा पाटील आयोजित ५५ लाखांची गोकुळहंडी वेधणार ठाणेकरांचे लक्ष
ठाणे : शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या गोकुळहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोकुळ दहीहंडी ही ठाण्यातील एक प्रतिष्ठित दहीहंडी बनली असून यामध्ये एकूण ५५ लाखांची बक्षिसे आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहेत. तरुणाईचा उत्साह, थरांचा थरथराट आणि ठाण्याची सामाजिक बांधिलकी हे गोकुळहंडीचे विशेष असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली.
प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख 55 हजार 555 रोख रक्कम व चषक बक्षीस दिले जाणार असून पुढील प्रत्येक नऊ थरास रुपये ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. ठाण्याची हंडी २ लाख २२ हजार २२२ रुपये व चषक त्याचबरोबर मानाची गोकुळ हंडी महिला गोविंदा पथकास एक लाख ११ हजार १११ व चषक अशी रक्कम बक्षीस दिली जाणार आहे. याशिवाय आठ थराची सलामी ५१ हजार व चषक,सात थराची सलामी १२ हजार व चषक, सहा थराची सलामी ९ हजार व चषक,पाच थराची सलामी ५ हजार व चषक, चार थराची सलामी ३ हजार व चषक, अशी बक्षिसे पुरुष गटासाठी असून सात थराची सलामी २५ हजार व चषक, सहा थराची सलामी १५ हजार व चषक, पाच थराची सलामी १० हजार व चषक, चार थराची सलामी ३ हजार व चषक अशी बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. मागील वर्षी या दहीहंडीच्या निमित्ताने अर्जुन पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, व अन्य क्षेत्रातील क्रीडापटूंचा सत्कार करण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजकांनी राबवला होता. यावर्षीही ठाण्याच्या हिताचे सामाजिक उपक्रम या दहीहंडीच्या निमित्ताने राबवले जातील असे आयोजक कृष्णा पाटील यांनी सांगितले आहे. ठाण्याच्या मूलभूत नागरिक समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले. गोकुळ दहीहंडी ही हिंदू सणांचे प्रतीक बनतानाच तरुणाईचा उत्साह आणि शहराच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव याची सांगड घालणारी अनोखी दहीहंडी ठरेल असेही कृष्णा पाटील म्हणाले.या दहीहंडी निमित्त गोविंदांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा, सिने कलाकार त्याचबरोबर मान्यवर लोकांच्या भेटीगाठी व मार्गदर्शन लाभणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.