अलिबाग :  घटनेने दिलेले सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य  आबाधीत राखणे ही  न्यायव्यवस्थेत काम करणार्‍या वकीलांची व न्याधीशांची जबाबदारी आहे. त्यामुळे या व्यवस्थेत काम करणार्‍यांनी  झुंडशाही , व कोणत्याही दबावाला बळी नपडता निपक्षपातीपणे काम केले पाहिजे,  असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी व्यक्त कले.

रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांचे ‘ जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्व ‘  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि.24) क्षात्रैक्य सभागृह , कुरूळ येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. आय. छागला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये, रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. उदय वारूंजीकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. गजानन चव्हाण, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. विठ्ठल कोंडे – देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य जयंत जायभावे , जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हा व तालुका न्यायालयात सर्वसामान्य माणसे येत असतात. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ही न्यायालये करत असतात. त्यामुळे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत ही न्यायालये महत्वाची आहेत. त्यांना दुय्यम न्यायालये असे संबोधणे चुकीचे आहे. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी केले.

जिल्हा व तालुका न्यायालय ही सर्वसामान्यांची न्यायालये आहेत. त्यांच्यासाठी ही शेवटची न्यायालये असतात. ते या पुढील न्यायालयात जावू शकत नाहीत. याच न्यायालयांमध्ये अशीलाचे भवितव्य घडते किंवा बिघडते. त्यामुळे येथेच व्यवस्थित पुरावे नोंदवून आपल्या अशीलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न वकिलांनी केला पाहिजे, असे न्यायमुर्ती अभय ओक म्हणाले.

जिल्हा व तालुका न्यायालयात काम करणार्‍या वकीलांनी आपणास कमी समजू नये. सर्वोच्च  व उच्च न्यायालयात काम करणार्‍या वकीलांपेक्षा आपले ज्ञान  कमी आहे असे समजू नये .  त्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा., असे ते म्हणाले.

सर्वसामान्यांच्या अपेक्षा न्यायालयांकडून पूर्ण होत नसल्यामुळे न्यायालयाबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये लौकिक कमी होत चालला आहे. न्यायालयाच्या   विश्वासार्हतेला तडा जात आहे. न्यायदानात उशीर होत असल्यामुळे न्यायालयाची बदनामी होत आहे.  त्यामुळे न्यायालयाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करा. वेळ पाळा. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असा सल्ला न्यायमुर्ती अभय ओक यांनी तरूण वकीलांना दिला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये म्हणाले की, न्यायालयात आपल्या अशीलाला निकाल मिळणार की न्याय मिळणार याचा विचार करा. माहिती मिळवा. ज्ञानाच्या बळावर शहाणपण कमवा. त्यातून आपली प्रगती करावी.

अ‍ॅड. उदय वारूंजीकर, अ‍ॅड. गजानन चव्हाण , अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी प्रस्ताविक केले. सचिव अ‍ॅड. अमित देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले. अ‍ॅड. विजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *