अशोक गायकवाड
रायगड : जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पीएम किसानचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
आदिम जमातीच्या (कातकरी) विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM- JANMAN) ही मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाने ११ प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये ९ मंत्रालयाचा समावेश केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे व पीएम किसान चा लाभ देण्यात येणार आहे.प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प., तहसिलदार सर्व, गट विकास अधिकारी-पंचायत समिती सर्व, तालुका कृषी अधिकारी सर्व व अग्रणी बँक व्यवस्थापक यांचा या शिबिरात समावेश असणार आहे. जातीचे दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन बचत खाते, पीएम किसानचा लाभ यापासून एकही आदिम व्यक्ती वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.