मुंबई : जगात १९५ देश असून लोकशाही,हुकूमशाही, धर्मशाही, राजेशाही, साम्यवादी, समाजवादी, लष्करशाही अशा विविध शासन व्यवस्था आहेत. पुन्हा या देशांचे विकसित, विकसनशील आणि अविकसित देश असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या पैकी लोकशाही शासन व्यवस्थेतच लोकांना आपली मते, विचार, आशा आकांक्षा, तक्रारी मांडण्याची संधी मिळते.यामुळे लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेल्या भारतासारख्या देशात लोकांच्या मतांवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करू शकणाऱ्या माध्यमांची भूमिका पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत महत्वाची ठरते,असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते “पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत माध्यमांची भूमिका ” या विषयावर बोलत होते .
माध्यमांचा जनमानसावर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे या माध्यमांच्या माध्यमातून तसेच वेळप्रसंगी लोकांशी,विशेषतः ज्या पायाभूत सुविधांची उदा.रस्ते,रेल्वे,बंदरे,विमानतळ उभारणी करताना लोक जिथे थेट बाधित होणार असतील तिथे यथायोग्य जनजागरण झाले पाहिजे. माध्यमांना, लोकांना विश्वासात घेऊन सदरचे प्रकल्प कसे लोकहिताचे आहे ,हे पटवून देऊन लोकांचा सहभाग निर्माण करणे आवश्यक आहे.अशा प्रकल्पाबाबत लोकांचा विश्वास निर्माण झाल्यास विरोध राहणार नाही. परंतु देश हिताच्या दृष्टीने आवश्यक अशा काही प्रकल्पात राजकारण येते आणि अनेक प्रकल्प बारगळले जातात. असे प्रकल्प सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे, लोकांशी संवाद साधला तर अडथळे येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, एखाद्या प्रकल्पाबाबत लोक बाधित होत असतील, त्याला विरोध होत असेल तर अशावेळी लोकांची भूमिका, लोकांची मते लक्षात घेणे आवश्यक आहे.लोकांच्या विरोधामुळे अनेक एस ई झेड प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. जैतापूरचा प्रकल्प लोकांच्या विरोधामुळे उभा राहू शकला नाही. यासाठी लोकांची मानसिकता निर्माण करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते, असेही ते म्हणाले.
००००