अनिल ठाणेकर
ठाणे : मालवण येथील घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली, तरी माफी मागणे पुरेसे नसल्याची विधाने महाविकास आघाडीकडून केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर डिस्कव्हरी इंडियात टीका केल्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी माफी मागितली होती. शीख हत्याकांडाबद्दल सोनिया गांधी, तर न्यायालयात राहुल गांधी यांनी माफी मागितली होती. महाविकास आघाडी उद्या जोडे मारा आंदोलन करीत असताना माफी मागितल्याबद्दल पंडित नेहरू, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जोडे मारणार का, असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज येथे केला. भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. या वेळी भाजपाचे माध्यमप्रमुख नवनाथ बन, भाजपाचे शहर उपाध्यक्ष सागर भदे, सुजय पत्की आदी उपस्थित होते.
मालवण येथील घटना दु:खद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरही महाविकास आघाडीकडून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माफीनंतरही जोडे मारा आंदोलन केले जात असेल, तर यापूर्वी पंडित नेहरू, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माफी मागितली. उद्याच्या आंदोलनात सर्वप्रथम या नेत्यांना कॉंग्रेसचे नाना पटोले, शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि उबाठा गटाचे संजय राऊत जोडे मारणार का, असा सवाल श्री. उपाध्ये यांनी केला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोडे मारेल, असा टोलाही श्री. उपाध्ये यांनी लगावला. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हाती जनतेला सांगण्यासारखे काहीही नसून, त्यांच्या कारकिर्दीत १०० कोटींची खंडणी, बंद पडलेले उद्योग, घरात बसलेले मुख्यमंत्री यांच्यासह विकासाचे एकही काम दाखविता येणार नाही. तर महायुती सरकारने विकासकामांमध्ये आघाडी घेतली, असे नमूद करून ठाकरे-पवार जोडीकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप श्री. उपाध्ये यांनी केला. कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविता आली नव्हती. त्यांचे छत्रपती शिवरायांवरील प्रेम बेगडी होते, अशी टीका श्री. उपाध्ये यांनी केली.