मुंबई- “पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची माफी मागत असताना मागे बसलेले देवेंद्र फडणवीस हसत होते”, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची, शिवप्रेमींची माफी मागितली, मात्र उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला माफी मागायला लावणार का? कित्येक वेळा काँग्रेसने, त्यांच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांनी त्यांना कधी माफी मागायला सांगितली नाही”.

फडणवीसांचा ठाकरे-पवारांना प्रश्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मल उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा आहे की भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये जे काही लिहिलं आहे, त्याबाबत ते काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महाराजांचा एक पुतळा तिथल्या कमलनाथ सरकारने बुलडोझर लावून तोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे याबाबत मूग गिळून गप्प का बसले आहेत? कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला, त्याबद्दल उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काहीच का बोलत नाहीत?”

उपमुख्यमंत्री म्हणाले, गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला. त्यांनी देशाला शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. मात्र शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. त्यांनी केवळ स्वराज्याचा लुटलेला खजिना परत मिळवला. काही ठराविक लोकांकडून तो खजिना त्यांनी परत मिळवला जो पुढे स्वराज्यासाठी वापरला. मात्र, आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला गेला. महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं आणि तिथल्या सामान्य माणसांची लूट केली नाही. मात्र महाराज जणू तिथल्या सामान्य लोकांची लूट करायला सुरतेला गेले होते असा चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला. याबाबत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *