पर्यटकांची मागणी
थेरान : पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी ई रिक्षा मैलाचा दगड ठरत असताना ह्या सेवेचा लाभ अगोदर आम्हा पर्यटकांना देण्यात यावा अशी मागणी खुद्द पर्यटकांकडून केली जात आहे.
गेल्यावर्षा पासून याठिकाणी पर्यटकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ई रिक्षाचा प्रवास लाभदायक ठरत असल्यामुळे माथेरानला केवळ याच सेवेमुळे पर्यटकांनी सर्वाधिक पसंती देऊन मोठया प्रमाणावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मोटार वाहनाने दस्तुरीला आल्यावर ई रिक्षाचा रेल्वे स्टेशन पर्यंत केवळ ३५ रुपये माणसी दर आकारला जात असल्याने ह्या प्रवासासाठी पर्यटक आपल्या लहान मुलांना घेऊन रिक्षा स्टँडवर ताटकळत उभे असतात.अशावेळी स्थानिक लोक सुध्दा ई रिक्षातून प्रवास करण्यासाठी गर्दी करत असून रिक्षा आल्या आल्या ताबडतोब रिक्षात बसण्याची घाई करत असतात. त्यामुळे ताटकळत उभे असणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होताना दिसून येत आहे.स्थानिक लोक ज्यावेळी रिक्षा स्टँडवर येतात त्यावेळी त्यांना सुध्दा काही वेळ थांबविण्यासाठी संबंधित कर्मचारी वर्गाने सूचित करून अगोदर पर्यटकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. ई रिक्षाच्या समर्थकांनी जरी ह्या ई रिक्षा सुरू होण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले असले तरी सुद्धा घाई न करता ज्या पर्यटकांमुळे आपल्या घरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे त्यांना अदबीने आणि प्रेमाने सहकार्य करणे आवश्यक आहे.केवळ ई रिक्षा मुळे इथे ऐन मंदीच्या काळात सुध्दा पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटक आले तरच येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल याची जाणीव स्थानिकांनी ठेवल्यास ही सेवा सुरळीत कायमस्वरूपी चालू राहणार आहे.रिक्षा स्टँडवर स्थानिक लोकांच्या गर्दीत ज्यांनी ज्यांनी आजवर ई रिक्षाला विरोध दर्शविला आहे अशीच मंडळी प्रामुख्याने ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी उतावीळ असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांचा आजही या ई रिक्षाला विरोध आहे त्यांनी मुळात या सेवेचा लाभ घेतला नाही तर उत्तम होईल.त्यांनी कायमस्वरूपी विरोधी भूमिका घेतली तरी आमची काहीएक हरकत नाही असेही सुज्ञ ई रिक्षा समर्थक नागरिक बोलत आहेत.
——————————————————-
आम्ही रविवारी एक दिवसीय पर्यटनासाठी इथे आलो होतो. सोबत लहान लहान मुले आणि आईबाबा होते. जवळजवळ अर्ध्या तासाने आमचा ई रिक्षासाठी नंबर आला पण त्याचवेळी मध्येच गावातले काही लोक आले आणि थेट रिक्षात जाऊन बसले.त्यासाठी संघटनेने योग्य नियोजन केल्यास सर्वांना या सेवेचा लाभ मिळू शकतो.गावकऱ्यांनी अगोदर येणाऱ्या पर्यटकांना प्राधान्य दिल्यास कुणालाही ताटकळत उभे राहण्याची वेळ येणार नाही.
नटेश्वर मांगले-पर्यटक मुंबई
