ठाणे : एका घरामध्ये एक कुटुंब सुखी होण्यासाठी आपल्या सरकाने जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या सरकारने घेतलेले नाहीत. मी अपॉइंटमेंटवर चालणारा मुख्यमंत्री नाही. पुर्वी एसटी हात दाखवून थांबवली जात तसेच माझे आहे. मला कोणी भेटले की थांबावे लागते अशा भावना व्यक्त करत विजयाचा संकल्प आम्ही सोडणार आणि दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आपल्याला सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या आहेत असेही ते म्हणाले.
ठाणे जिल्हा शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला गणेश दर्शन पारितोषिक वितरण सोहळा २०२२-२३ गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. यावेळी या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विविध गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री शिंदे आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान, शिंदे म्हणाले की, मी सीएम म्हणजे स्वत:ला कॉमन मॅन म्हणतो.
अपेक्षा ठेवून काम केले आणि जर ते मिळाले नाही तर माणसाचा भ्रमनिरास होतो तो माणूस समाजसेवा आणि राजकीय जीवनातून कायमचा नष्ट होतो. म्हणून मला काय मिळेल यापेक्षा मी दुसऱ्याला काय देईल हा विचार करुन आपण काम केले पाहिजे. मी ज्यावेळी लाडकी बहिण, लाडका भाऊ ही योजना आणली तेव्हा विरोधकांनी ही निवडणूकीसची घोषणा असल्याचे आरोप केले. पण मी जे करणार तेच बोलणार. माझ्या डोक्यात मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक योजना होत्या. लाडकी बहिण ही योजना बंद करण्यासाठी अनेक जण न्यायालयात गेले. मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो की सावत्र भावांपासून सावध रहा. हे सावत्र भाऊ, आता हायकोर्टात गेले आहे. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर महिलांना सक्षम करण्यासाठी तीन हजारांच्या पुढेही पैसे द्यायला हात आखडता घेणार नाही आणि भावांसाठी पण तेच करणार असे ते म्हणाले.
अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. नरेश म्हस्के, आ. प्रताप सरनाईक, यावेळी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आ. कुमार आयलानी, माजी आ. रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे व इतर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
