ठाणे : जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज पार पडला. जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांच्या शुभहस्ते ८ अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला.‌
या प्रसंगी मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता सदिच्छा दिल्या. पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य रहावे, आपल्या आवडी जपण्यासाठी वेळ द्यावा अशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिक्षक अरुण शेलवले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गेली 39 वर्षे ठाणे ग्रामीण भागात शिक्षक म्हणून सेवा दिली, आज सेवानिवृत्त होताना आनंद होत आहे. प्रत्येक आठवड्यातील एक दिवस विना वेतन जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करणार अशी ग्वाही दिली. हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मोलाचे काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विभाग प्राथमिक ५, ग्रामपंचायत विभाग २, आरोग्य विभाग १ असे जिल्हा परिषदेचे एकूण ८ अधिकारी व कर्मचारी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षक, विस्तार अधिकारी (ग्रा.पं), आरोग्य सेविका या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *