मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या संदर्भात बुधवारी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“उद्या यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल. पण राज्यात गणपती येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उद्या महाराष्ट्रात आहेत. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सगळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जाणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि आवाहन की आपण संप करु नये. सकारात्मक चर्चेतून आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने काम बंद आंदोलन पुकारल्याने २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळण्याची आहे. तसेच २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ, ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी व घरभाडे भत्त्याची थकबाकी अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.
