मुंबई : मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. त्यामुळं तो जवळजवळ गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला आहे. त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे, या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत शिवपुतळ्याची विटंबना, भाजपच्या लाडक्या उद्योगपती अदानीकडून आणि कंत्राटदाराकडून होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. ते भाजप आणि शिंदे गटाचं नाही कारण शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान शिकवला आहे तो त्यांच्याकडे गुणभरही उरलेला नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
लाडक्या उद्योगपतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अपमान हे उघड्या डोळ्यानं पाहत आहेत. आमचे शिवसैनिक तो पुतळा सोडवण्यासाठी गेले मुंबई विमानतळावर तेव्हा, अदानींनी ठेवलेले 200 बाऊन्सर शिवसैनिकांच्या अंगावर चाल करुन येत होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. हे लोक बाहेर जाऊन हिंदुत्वाच्या नावावर भाषण देतात, अशी टीका देखील राऊत यांनी केली.
