विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा दावा
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना खासदारांचा पत्ता कट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली असून शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहेत असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे.
उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता लोकसभेची जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. शिंदे आणि अजित पवार गटही गोंधळलेले आहेत. भाजपचीही दमछाक होत आहे. इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. त्यामुळे लोकांना भीती वाटते की, स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम असू. जनतेने ठरवले आहे की, भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर काढायचं. गडचिरोली तर आम्ही जिंकूच, भाजपला दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत आमचे किरसान उभे आहेत, ते निवडून येतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. यावर विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही. ती जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती. सगळ्या वादात फार ताणून घ्यायचे नाही. नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे.